फोटो, ऑडिओ क्लिपमुळे नवा गौप्यस्फोट
पुणे : प्रतिनिधी
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले महाविकास आघाडीतील वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी जनतेसमोर आले. जवळपास 15 दिवस बेपत्ता असलेल्या राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा केला. अशातच पूजाच्या लॅपटॉपमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संशयाची सुई पुन्हा एकदा राठोड यांच्याकडे वळली आहे.
पूजा राठोड प्रकरणात अरुण राठोड, अनिल चव्हाण ही दोन नावे याआधी समोर आली आहेत. यानंतर आता ‘गबरू’ हे नवे नाव समोर आले आहे. त्यामुळे हे गबरू नेमके कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गबरूच्या नावाच्या केकचे फोटो या लॅपटॉपमध्ये आढळले आहेत. हा गबरू पूजाला आपल्या हाताने केक भरवतानाचा फोटोही त्यात आहे. विशेष म्हणजे केक भरवणार्या गबरूच्या हातात शिवबंधन आणि काळा दोरा दिसत आहे. त्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
दुसर्या एका फोटोमध्ये पूजा स्वतः वनमंत्री असे नाव लिहिलेला केक कापताना दिसत आहे. त्या केकवर संजय राठोड यांचा फोटो आहे. पुढच्या दोन फोटोंमध्ये पूजा आणि संजय राठोड एकत्र दिसत आहेत. यातीले ठिकाण, बॅकग्राऊंड सारखेच असून, दोघांच्या डोक्यावर फरची टोपी एकसारखीच आहे.
पूजा आणि गबरू यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात तुमचा नंबर रिजेक्ट लिस्टमधून काढला. कुलू, मनाली आणि जम्मू- काश्मीरला जाऊ, असा संवाद आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवीच्या दर्शनानंतर आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता, मात्र नव्या फोटो आणि ऑडिओ क्लिपमुळे ते पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले नाहीत : शेलार
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना राज्याचे वनमंत्री तथा शिवसेना नेते संजय राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे, मात्र यामुळे मूळ मुद्दा दुर्लक्षित होताना दिसत आहे. यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘कोरोना काळात गर्दी केली म्हणून 10 हजार जणांवर गुन्हे दाखल करू, पण गर्दी जमवणार्या एका गबरूवर कारवाई नाही. एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात तो मी नव्हेच हे सुरू आहे’, असा टोला भाजप नेते शेलार यांनी लगावला आहे.