लातूर : प्रतिनिधी
शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महायुतीच्या जाहीर सभेच्या निमित्ताने मराठवाड्यातील औसा या शहरात एकत्र येत आहेत. लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी औसा येथे सकाळी 9.30 वाजता विराट सभा मंगळवारी (दि. 9) आयोजित करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर होत असतानाच शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि प्रचाराचा झंझावात सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्याहून महाराष्ट्रातील प्रचार सभांना सुरुवात केली. आता मंगळवारी मराठवाड्यात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचारसभेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते प्रथमच लातूर जिल्ह्यात दाखल होत असून, या जाहीर सभेकडे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचेच नव्हे; तर मराठवाड्याचे लक्ष लागलेले आहे. औसा येथे 9 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे.
या सभेस पंतप्रधान मोदी व शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील, रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले, रासपचे प्रमुख महादेव जानकर, शिवसेना उपनेते तानाजी सावंत, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.