Breaking News

धोत्रेवाडीमधील आदिवासींचे पाणी फार्महाऊस मालकाला

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील धोत्रेवाडीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील दोन विहिरींपैकी एक विहीर आटली आहे, तर दुसरी विहीर खाजगी जमीन मालकाने आपल्या फार्महाऊसमध्ये कुंपण बंद केली आहे. दरम्यान, शासनाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधील पाणी फार्महाऊस मालक वीज पंप लावून आपल्या बागेतील झाडांना घालत आहेत, मात्र त्या वेळी बाजूच्या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

कर्जत तालुक्यातील तब्बल 39 गावे आणि 57 आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. पाथरज ग्रामपंचायतीमधील धोत्रेवाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी लोकांना वणवण करावी लागत आहे. आदिवासी विकास विभागाने त्या वाडीसाठी दोन विहिरी खोदून दिल्या आहेत, त्यातील एका विहिरीने तळ गाठला आहे. दुसरी विहीर पाण्याने तुडुंब भरली आहे, मात्र ती विहीर शेतकरी असलेल्या खाजगी व्यक्तीच्या जागेत आहे. सदर जमीन नवी मुंबई येथील व्यक्तीने खरेदी केली आणि सरकारी निधीमधून खोदण्यात आलेली विहीर त्या नवीन जमीन मालकाची झाली, मात्र त्या आधी त्या विहिरीचे पाणी धोत्रेवाडीमधील आदिवासी लोक वापरत होते. नवी मुंबईमधील त्या जमीन मालकाने आपल्या जमिनीला कुंपण घातल्याने आणि आतमध्ये कोणालाही प्रवेश देण्यास विरोध केल्याने धोत्रेवाडीमधील लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

धोत्रेवाडीमधील आदिवासी लोकांनी त्या जमीन मालकाविरुद्ध गतवर्षी जोरदार आवाज उठविल्यानंतर कर्जत तहसील कार्यालयाने विहीर अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला, मात्र मे 2018 मध्ये तहसीलदारांची पाठ फिरली आणि पुन्हा त्या फार्महाऊस मालकाने आपल्या जमिनीतील विहिरीजवळ येण्याचा मार्ग बंद केला होता.

  • या वर्षी धोत्रेवाडीमध्ये पुन्हा एकदा पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली असून शासनाच्या निधीमधून बांधलेली विहीर फार्महाऊस मालकाने कुंपण घालून बंद केली आहे. सदर जमीन मालक शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी वीज पंप लावून आपल्या फार्महाऊसमधील झाडांना घालण्याचे काम करीत आहेत.

धोत्रेवाडीमधील विहिरीत भरपूर पाणी असूनदेखील आमच्या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आम्हाला आमच्या विहिरीचे पाणी हवे आहे.

-जयवंती हिंदोळा, सदस्य, कर्जत पंचायत समिती तथा ग्रामस्थ

  • पाणीटंचाई आणि दुष्काळ सदृश काळात पिण्याच्या पाण्यासाठी कोणालाही अडवू शकत नाही. या काळात झाडांपेक्षा मनुष्यप्राणी महत्त्वाचा समजला जातो, त्यामुळे तक्रारी प्राप्त होताच विहिरीचे अधिग्रहण करण्याची कार्यवाही केली जाईल. संबंधित फार्महाऊस मालकाशी प्रशासनाकडून संपर्क साधला जात असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत त्यांना योग्य ते निर्देश दिले जातील.

-अविनाश कोष्टी,  तहसीलदार

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply