Breaking News

कोकणचे सामर्थ्य अधोरेखित करणारे कलादालन

देशातील 45 भारतरत्नांपैकी सहा कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी, देशाची कीर्ती जगभरात पोहचविणारी अनेक नररत्ने कोकणाने दिली आहेत. राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाट्य-संगीत, आदी विविध क्षेत्रांत जगात नावलौकिक मिळविणार्‍या, कोकणाचे सामर्थ्य अधोरेखित करणार्‍या व्यक्तींच्या तैलचित्रांचे चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारलेले ‘सुरेश भार्गव बेहेरे व्यक्तिचित्र कलादालन’ नुकतेच (17 नोव्हेंबर) रसिक-जिज्ञासूंना पाहण्यास खुले झाले. मुंबई ते गोवा महामार्गावरील अश्मयुगकालीन ठेवा असलेल्या एकमेव वस्तुसंग्रहालयाची (24 नोव्हेंबर 2018) उभारणी केल्यानंतर वर्षभरातच वाचनालयाने कलादालन खुले केले. कोकणाला स्वतःच्या आत्मविश्वासाची जाणीव करून देणारे, समाजसाहाय्यातून सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारले गेलेले ‘वस्तुसंग्रहालय आणि कलादालन’ हे दोन्ही भव्यदिव्य प्रकल्प आवर्जून भेट देऊन पाहावेत, पुढील पिढीला समजावून सांगावेत इतके महत्त्वाचे आहेत.

कोकणातील बुद्धिमत्ता हा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय असलेले भारत सरकारच्या नवी दिल्ली भटके विमुक्त जनजाती विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत पुणे डेक्कन अभिमत विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांच्या हस्ते सुरेश भार्गव बेहेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘व्यक्तिचित्र कलादालन’ प्रकल्पाचे उद्घाटन झाले. कोकणात बुद्धिमंतांची मांदियाळी आहे. इथली बौद्धिक शक्ती प्रचंड आहे. कोकणाने अनेक महनीय व्यक्तिमत्त्व जगाला, देशाला दिलीत. त्याबाबतची माहिती येथे मिळते. प्रकल्पाची उभारणी होत असताना ‘सर्वांच्या सक्रिय सहकार्यातून स्वप्नपूर्तीचा आनंद’ अनुभवता आल्याची वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांची प्रतिक्रिया प्रकल्प उभारणीमागची कहाणी सांगते. याच उद्घाटन कार्यक्रमात डॉ. शिंदे यांना लो. टि. स्मा.च्या अरविंद तथा अप्पा जाधव उपरान्त संशोधन केंद्राचा पहिला अपरान्त भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हडप्पाकालीन स्थळ असलेल्या राखीगढी येथे मानवी सांगाड्यातील डीएनएच्या शास्त्रीय अभ्यासावरून ‘हडप्पा हीच वैदिक संस्कृती’ असल्याचा निष्कर्ष मांडणारे डॉ. वसंत शिंदे यांच्या हस्ते या कलादालनाचे उद्घाटन झाले. हडप्पा संस्कृतीला कोणा परकीय आर्यांनी नष्ट करून स्वत:ची संस्कृती वसवली. या गेल्या दोन शतकांतील विचाराला छेद देणारे संशोधन डॉ. शिंदे यांनी पुढे आणले. मूळचे मोरवणे-चिपळूणचे असलेले डॉ. वसंत शिंदे गेली अनेक वर्षे हडप्पा संस्कृतीवर संशोधन करीत होते. हरियाणा येथील राखीगढी या हडप्पा संस्कृतीच्या स्थळावरील उत्खननादरम्यान त्यांना 45 वर्षीय हडप्पाकालीन महिलेच्या कानातील हाडात अखंड डीएनएचे काही नमुने मिळाले. प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतर त्या स्त्रीची गुणसूत्रे आणि आज भारतीयांमध्ये आढळणार्‍या गुणसूत्रांमध्ये कमालीचे साम्य असल्याचे पुढे आले. हे साम्य पडताळून पाहण्यासाठी डॉ. शिंदे आणि त्यांच्या सहसंशोधकांनी 1400 भारतीयांच्या डीएनएचे नमुने गोळा केले.

आपण भारतीय त्या हडप्पाकालीन संस्कृतीचेच वंशज आहोत व आर्य कोणी बाहेरून आलेले नसून तेही याच संस्कृतीचा एक भाग असल्याचा दावा डॉ. शिंदे यांच्या टीमने केला. त्यांचा हा शोधप्रबंध सेल व सायन्स या दोन जागतिक दर्जाच्या प्रतिष्ठित संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला. याचा आधार घेत संग्रहालय आणि कलादालन प्रकल्पाचे ‘योजक’ वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी वाचनालयावर अनेकांचा विश्वास असल्याचे नमूद करून केलेले ‘वसंतराव शिंदे सरांनी वाचनालयाला मोठं व्हायला संधी दिली’ हे विधान डॉ. शिंदे यांच्या कार्याबद्दल खूप काही सांगून जाते. डॉ. वसंतराव शिंदे यांनी ‘आर्य भारतीयच होते’ हा मांडलेला सिद्धांत सन 1946 ला आपल्या एका ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्याचे इदाते यांनी नमूद केले. इदाते यांनी आपल्या भाषणातून कोकणाची बौद्धिक संपत्ती उलगडली. त्या संपत्तीला कायमस्वरूपी तैलचित्रांच्या माध्यमातून कलादालनाच्या रूपाने उभारण्याचा वाचनालयाचा विचार अत्यंत अभिनंदनीय व तितकाच अनुकरणीय आहे.

खरंतर कलादालन ही सुरुवात आहे. हे प्रवाही काम आहे. यात अजून बरीच नावे जोडता येण्यासारखी आहेत. आगामी काळात वाचनालयाच्या माध्यमातून ते होतही राहणार आहे. मूळचे धामणीचे डॉ. हरिभाऊ वाकणकर हे रेल्वेतून प्रवास करीत असताना त्यांना डोंगरात चित्र दिसली. त्यांनी ट्रेनमधून उतरून पुढचे आठ दिवस अंगावरच्या वस्त्रानिशी तिथे काढले. ज्यातून जगातील सर्वांत पुरातन ठेवा दोन लाख वर्षांपूर्वीची शैलचित्रे जगापुढे आली. त्यांचे तैलचित्र येथे भेटते. आरे-गुहागरचे सीताराम केशव बोधे यांनी सन 1923 साली ‘अस्पृश्यांना सार्वजनिक जागी जाता आलं पाहिजे’ असा डॉ. आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला पूरक ठरणारा ठराव विधिमंडळात मांडला होता.

या कलादालनात आपल्याला लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, झांशीची राणी लक्ष्मीबाई, भागोजीशेठ कीर, बाळासाहेब ठाकरे, स्वामी स्वरूपानंद, टेंबे स्वामी, दादासाहेब मावळकर, भास्करराव जाधव, डॉ. हरिभाऊ वाकणकर, वासुदेव विष्णू मिराशी, हमीद दलवाई, श्री. भी. वेलणकर, गोळवलकर गुरुजी, अनंत कान्हेरे, त्र्यंबक शंकर शेजवलकर, नानासाहेब जोशी, रियासतकार सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, सेनापती बापट, बाळाजी विश्वनाथ, डॉ. आनंदीबाई जोशी, दुर्गाबाई भागवत, सचिन तेंडुलकर, गोविंद वल्लभ पंत, धोंडो केशव कर्वे, पां. वा. काणे, विंदा करंदीकर, बॅ. नाथ पै, नानासाहेब गोरे, मधू मंगेश कर्णिक, राम मराठे, शंकर घाणेकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, भार्गवराम विठ्ठल वरेरकर, एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, डॉ. तात्यासाहेब नातू, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, विष्णुपंत छत्रे, वसंत देसाई, सुरेश भार्गव बेहेरे, नाना शंकरशेठ आदी 80 तैलचित्रे येथे आपल्याला पाहता येतात. प्रत्येक चित्रामागे, आयुष्यामागे मोठं काम उभं आहे. त्याची आवश्यक जाणीव, अभ्यास वाचनालयाकडे आहे. म्हणूनच वाचनालयातर्फे आगामी काळात कलादालनातील व्यक्तिमत्त्वांची माहिती देणारे पुस्तिक प्रकाशित केले जाणार आहे. हे पुस्तक घराघरात पोहचविण्याचा वाचनालयाचा मानस असणार आहे. 

कोकणातील असामान्य व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, विविध क्षेत्रांतील त्यांच्या अभिमानास्पद कार्याचा परिचय करून देण्यासाठी लोटिस्माने व्यक्तिचित्र कलादालन साकारले. अनेक दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहाय्यातून कोकणच्या सुपुत्रांची तैलचित्रे या कलादालनात साकार झाली आहेत. तीन वर्षांच्या मेहनतीतून साकारलेल्या या तैलचित्र कलादालनात आपल्याला रवींद्र धुरी, तुकाराम पाटील, सीताराम घारे, रामचंद्र कुंभार, एस. टी. शेट्ये, के. जी. खातू, विक्रम परांजपे या ख्यातनाम चित्रकारांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून साकारलेली चित्रे भेटतात. चित्राखालची माहिती वाचत, हॉलमधील भारून टाकणारे ऐतिहासिक वातावरण ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवत प्रत्येकाला विलक्षण क्षणाचे साक्षीदार होता येते. पाहणार्‍याला आपण आपल्या जीवनातील एक सर्वोत्तम क्षण जगत असल्याची निश्चित अनुभूती घेता येईल इतकी क्षमता या प्रकल्पांत आहे. हे संग्रहालय-कलादालन बुधवार, सार्वजनिक सुटी वगळता इतर दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले (माफक शुल्कासह) असते. संपर्कासाठी पत्ता : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संग्रहालय, जुन्या बहिरी मंदिराजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, दूरध्वनी : 02355- 257573, मो. 9423831668.

-धीरज वाटेकर, मुक्त पत्रकार, चिपळूण

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply