नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर आभासी कार्यशाळेचे गुरुवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानता व वैवाहिक कायदेशीर बाबींची जाणीव निर्माण करून देणे असा होता. या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. स्त्री मुक्ती संघटना, नवी मुंबई यांच्या वतीने संगीता सराफ यांनी लैंगिक समानता व जोडीदाराची निवड या विषयावर व्याख्यान दिले. तसेच चंद्रकांत सर्वगोड यांनी वैवाहिक समायोजन आणि लैंगिक शिक्षण, विवाहातील कायदेशीर पैलू या विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या चर्चेत विद्यार्थीही उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
कार्यक्रमात अंकिता पायमोडे, शाम्भवी जोशी, ज्योती तायडे व श्रीधर खांबे या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी 142 विद्यार्थ्यांनी आभासी सहभाग नोंदवला. प्रा. सोनाली हुद्दार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नीलिमा तिदार व प्रा. भावेश भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन सर्वांचे कौतुक केले.