नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मागील वर्षी कोरोनामुळे आशिया चषक रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आशिया चषकाचे आयोजन या वर्षी करण्यात येणार आहे, पण यंदा होणारा आशिया चषकही रद्द होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर आशिया चषक रद्द होण्याचे खापर पाकिस्तान आता भारतावर फोडत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
या वर्षी आशिया चषकाचे आयोजन जून महिन्यात करण्यात आले आहे, पण जून महिन्यात विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला आहे, पण भारतीय संघाची या अंतिम फेरीत पोहण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे. कारण भारतीय संघाने सध्याच्या घडीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मालिकेतील चौथा सामना निर्णायक असणार आहे. या चौथ्या सामन्यात जर भारतीय संघ पराभूत झाला, तर त्यांना अंतिम फेरीत पोहचता येणार नाही. भारताऐवजी या वेळी ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहचू शकतो, पण चौथा सामना जर अनिर्णीत राहिला, तर इंग्लंडविरुद्धची मालिका भारतीय संघ 2-1 अशा फरकाने जिंकू शकतो आणि ते अंतिम फेरीत स्थान पटकावू शकतात. त्याचबरोबर जर भारतीय संघाने चौथा सामना जिंकला, तर त्यांची मालिकेत 3-1 अशी आघाडी होईल आणि भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहचू शकेल.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी या वेळी सांगितले की, गेल्या वर्षी आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले होते, पण ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. आता ही स्पर्धा श्रीलंकेमध्ये जून महिन्यात खेळवण्याचे ठरले होते, पण आशिया चषक आणि विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या तारखा या जवळपास सारख्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा आशिया चषक रद्द होऊ शकतो.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे डोळे लावून बसलेल्या क्रिकेट चाहत्यांची ही स्पर्धा रद्द झाल्यास घोर निराशा होणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या संघाने आशिया चषक रद्द होण्याचे खापर भारतावर फोडल्याची सूत्रांची माहिती आहे.