Breaking News

कांदा-बटाट्याच्या दरात घसरण

नवी मुंबई : प्रतिनिधी

कांद्याच्या दरात प्रचंड वाढ होत असताना घाऊक बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत दरात घट झाली आहे. 40 ते 45 रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा 25 ते 30 रुपयांवर खाली उतरला आहे. दुसरीकडे बटाट्याच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या महिन्यापर्यंत अगदी, घाऊक बाजारात 20 ते 25 रुपये किलो असणारा बटाटा आत्ता मात्र आठ ते 12 रुपये किलो झाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाऊन जाहीर झाला तर साठवलेला कांदा पडून राहील. कांद्याला आत्ता चांगला दर मिळत आहे. मग आताच कांदा विकायला काढावा. यासाठी शेतकरी जास्त प्रमाणात कांदा बाजारात पाठवून द्यायला लागले आहेत, मात्र यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. आणि मोठ्या प्रमाणात व्यापार्‍यांकडे कांदा पडून आहे. कारण कांद्याला आवक इतका उठाव बाजारात मिळत नाहीय. त्यामुळे आठवड्याभरापूर्वी 40 ते 45 रुपये किलो असलेला कांदा आत्ता 20 ते 22 रुपये किलोपर्यंत खाली आला आहे, अशी माहिती ओम साई कांदा बटाटा आडत संघाचे सचिव सुरेश शिंदे यांनी दिली आहे.

मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये आता सर्वच ठिकाणाहून बटाट्याची आवक होत आहे. नेहमी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश मधूनच बटाट्याची आवक बाजारात होत असते, मात्र आत्ता गुजरात आणि महाराष्ट्रातील तळेगाव येथूनही बटाटा घाऊक बाजारात येत आहे. या बटाट्याचा दर्जा चांगला आहे. आणि आवक भरपूर आहे. थेट किरकोळ व्यापार्‍यांना बटाट्याचा पुरवठा करणार्‍या गाड्या किरकोळ बाजारात जात आहेत. त्यामुळे बाजारात येणार्‍या बटाट्याला हवा तसा उठाव मिळत नाही. परिणामी बटाट्याचे दर खाली आले आहेत.

वाशीतील घाऊक बाजारात सध्या कांद्याच्या शंभर गाड्यांची आवक पुरते. मात्र या आठवड्यात कांद्याच्या दररोज सरासरी 150 गाड्यांची आवक झाली आहे. याकडेच महाराष्ट्रातून नाशिक, नगर, पुणे, सोलापूरमधून कांदा बाजारात येत आहे, तर गुजरात मधूनही कांद्याची आवक सुरू आहे. गुजरातमधून दररोज 10 ते 15  गाड्या न चुकता येत आहेत. त्यामुळे बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात कांदा आहे.

मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची आवक घटली आहे. नेहमी बटाट्याच्या 70 ते 80 गाड्यांची आवक बाजारात होत असते, मात्र आत्ता बाजारात बटाट्याला हवा तसा उठाव मिळत नसल्याने व्यापार्‍यांनी ही बटाटा मागवणे कमी केला आहे. परिणामी 50 गाड्यांचीच आवक बाजारात होत आहे आणि तो आठ ते 12 रुपये किलोने विकला जात आहे.

या वर्षी बटाट्याचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे सध्या बाजारात येणार्‍या बटाट्याचा दर्जा उत्तम आहे आणि खायला ही  तो चविष्ट आहे. मात्र उत्पादन अधिक झाल्याने बाजारात सर्व राज्यातून आवक होत आहे आणि दर पडले आहेत.

-मनोहर तोतलानी, बटाटा व्यापारी

ग्राहकांना दिलासा

शेतकरी हवालदिल झाले असले तरी ग्राहकांना मात्र दर पडल्याने दिलासा मिळाला आहे. घाऊक बाजारात कांदा 40 ते 45 झाल्याने किरकोळ बाजारात कांदा 50 ते 60 रु किलोनेच खरेदी करावा लागत होता. त्यामुळे सर्वानाच कांदा खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत होता, मात्र आता दर कमी झाल्याने किरकोळ बाजारातही कांद्यासह दर खाली येण्याची आशा ग्राहकांना आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply