पबमधील व्हिडीओ शेअर करीत मनसेचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन सरकार, प्रशासनाकडून करण्यात येत आहे, मात्र अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असाच एक प्रकार समोर आणला आहे.
मनसेचे नेते संतोष धुरी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वरळीतील पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचा प्रकार त्यांनी समोर आणला आहे. या माध्यमातून धुरींनी शिवसेनेचे नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ’मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत कोरोना संपला नसल्याचे सांगतात, पण वरळीतील कमला मिलमध्ये 12 वाजून गेल्यानंतरही पब सुरू आहे. इतर ठिकाणी 11 वाजता पब बंद होतात. मग वरळीतले पब रात्रीचे 12-1पर्यंत कसे काय सुरू असतात. यांना कोण परवानगी देते?’, असा सवाल धुरींनी उपस्थित केला.
मनसेचे नेते संतोष धुरींनी कमला मिल कंपाऊंडमधल्या युनियन पबमधून फेसबुक लाईव्ह केले. पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे व्हिडीओत दिसत होते. पबमध्ये कोणतेही सोशल डिस्टन्सिंग नव्हते. अनेकांच्या चेहर्यावर मास्क नव्हते. यावरून धुरींनी मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. ’आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचे सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे, पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे,’ असे धुरी यांनी म्हटले आहेे.
आमदार नितेश राणेंचा टोला
भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टन्सिगचे ज्ञान वाटत आहेत, असे नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. या अगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
यांना टोला लगावला होता.