Breaking News

कर्जत-पनवेल रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे बेमुदत उपोषण

 किरवलीकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले; समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनीला दर देण्याची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी

कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी   कर्जत तालुक्यातील कर्जत, वांजळे, मुद्रे या गावांसह किरवली ग्रामपंचायत हद्दीतील 33 शेतकर्‍यांची एकूण चार एकर जमीन संपादित करण्यात येत आहे. आमच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणेच दर द्यावा, या मागणीसाठी किरवली ग्रामस्थांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि. 1)पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

कर्जत-पनवेल दुहेरी मध्य रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना किरवलीचे अध्यक्ष अ‍ॅड. गोपाळ शेळके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असलेल्या या आंदोलनात शरद बडेकर, बबन गायकर, प्रभाकर शेळके, दत्तात्रय श्रीखंडे, अश्विनी बडेकर, कुंदा बडेकर, राजेश बडेकर, विठोबा बडेकर, महेश बडेकर आदी शेतकरी  सहभागी झाले आहेत.

 कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी  कर्जत तालुक्यातील रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. कर्जत, वांजळे, मुद्रे या गावातील जमिनी संपादित करण्यात आल्या असून, या गावातील प्रकल्पबधित शेतकर्‍यांना 10 ते 15 लाख गुंठा या प्रमाणे जमिनीचा दर देण्यात आलेला आहे. मात्र किरवली हे गाव कर्जत नगरपालिकेला लागून आहे, तरीसुध्दा तेथील शेतकर्‍यांच्या शेतजमिनीला कवडीमोलाचा दर देत आहेत.

आमच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणेच दर देण्यात यावा, दुहेरी रेल्वेमार्गात भूसंपादित जमिनी व्यतिरिक्त असलेली जमीनही ओसाड होणार असल्याने त्याचाही मोबदला मिळावा, घरातील एकास नोकरी द्यावी,  अशा मागण्या किरवलीतील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply