Breaking News

आता 24 तास कोरोना लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

एकीकडे देशातील काही भागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असतानाच दुसरीकडे सरकारने सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. 1 मार्चपासून देशभरातील 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. देशभरातील नागरिक आथा दिवसाच्या 24 तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरणासाठी असलेली वेळमर्यादा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिक आता दिवसाच्या 24 तासांत कधीही लस घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या वेळेचे महत्त्वही जाणतात. कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशभरात आतापर्यंत 1.54 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या आकडेवारीमध्ये मंगळवारी देण्यात आलेल्या सहा लाख नऊ हजार 845 लसींचाही समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या तात्पुरत्या आकडेवारीमध्ये ही माहिती दिली आहे. कोविड-19 विरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली होती. सुरुवातीला आरोग्य कर्मचार्‍यांना आणि 2 फेब्रुवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लसीकरणाची सुरुवात झाली होती. मंगळवारी संध्याकाळपर्यंत गोळा झालेल्या अंदाजित आकडेवारीनुसार आतापर्यंत एक कोटी 54 लाख 61 हजार 864 जणांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे, अशी  माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply