Breaking News

कोर्लई जमीन व्यवहार प्रकरण ; ठाकरे, वायकर परिवाराविरोधात  सोमय्यांची रेवदंडा पोलिसात तक्रार

रेवदंडा : प्रतिनिधी
कोर्लई येथील जमीन व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच रवींद्र वायकर यांच्या परिवाराविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. यावर सात दिवसांत एफआरआय दाखल करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.
अलिबाग तालुक्यातील कोर्लई येथे ठाकरे व वायकर परिवाराने केलेल्या जमीन व्यवहारात वनविभाग, ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, महसूल विभाग आदी संदर्भातील कृती व्यवहार हे सरकारी कागदपत्रांची छेडछाड व नियमांचे उल्लघंन करून, तसेच सरकारी अधिकाराचा गैरवापर, रेकॉर्ड व दस्तऐवज यांच्यासंबधी छेडछाड करून करण्यात आले आहेत, असा सोमय्या यांचा आरोप आहे. याच संदर्भात त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात ठाकरे व वायकर परिवाराविरोधात बुधवारी (दि. 3) तक्रार अर्ज दिला.
सोमय्या यांच्यासमवेत भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, माजी अध्यक्ष हेमंत दांडेकर, जिल्हा पदाधिकारी दर्शन प्रभू, महेश मानकर, संकेत जोशी, संदीप चिरायू आदी होते.
सोमय्या यांनी अलिबाग पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांच्याकडे तक्रार अर्ज दिला व सरकारी कागदपत्रांची छेडछाड, खोटे बोलणे, नकली पुरावे उभे करणे, फसवणूक, सरकारी महसुलाचे नुकसान, बनावट दस्तऐवज बनवणे, अनधिकृत व गैरकायदेशीर बांधकाम करणे, मालमत्तेच्या चुकीच्या व खोट्या किमती दाखवणे आदीसंदर्भात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रार अर्जात केली आहे.  
याशिवाय कै. अन्वय नाईक यांनी सन 2018 साली आत्महत्या केली असून, त्या संदर्भात तपास सुरू आहे, मात्र 12 नोव्हेंबर रोजी अन्वय नाईक यांच्या नावाने पैसे, घरपट्टी भरणे, ही मिळकत-घरे अन्वय नाईक यांच्या नावाने ठेवणे, मृत व्यक्तीच्या नावाने बेनामी आर्थिक व्यवहार करणे या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, तसेच कोर्लई जमीन घोटाळ्याचा सखोल तपास करून संबंधित व्यक्तीवर एफआरआय दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply