मुरूड : प्रतिनिधी
दिघी बंदराच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आगरदांडा ते इंदापूर या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येत असून, त्यापैकी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक जलद झाली आहे. बंदर वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते असावेत, या दृष्टीकोनातून एमएसआरडीसीमार्फत दिघी बंदर परिसरातील रस्ते विकसित करण्यात येत आहेत. दिघी बंदरात येणारा माल जलद गतीने पोहचवण्यासाठी आगरदांडा ते इंदापूर या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येत असून बंदर विकासाचा हा पहिला टप्पा आहे. आज या रस्त्याचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण असून उर्वरित 10 टक्के काम हे येत्या काही दिवसांतच पूर्ण होणार आहे. बंदरापासून जलद गतीने महामार्ग गाठण्यासाठी सदरचा रस्ता खूप उपयोगी पडणार आहे. आगरदांडा ते इंदापूर रस्त्यासाठी सुमारे 110 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून मालवाहतुकीसाठी सदरचा रस्ता मुख्य केंद्र असणार आहे. सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून या रस्त्याने जलद गतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर पोहचता येते. मुरूड, तळा, रोहा या तालुक्यांना या रस्त्याचा मोठा फायदा होत आहे. पूर्वी हा रस्ता अरुंद होता, परंतु आता तो चौपदरी व काँक्रीटचा करण्यात आल्याने या रस्त्यावरील प्रवास जलद गतीचा झाला आहे.