लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक
पनवेल ः रामप्रहर वृत्त
इंटरनॅशनल डान्स काऊन्सिल (पॅरिस) या संस्थेच्या सभासद असलेल्या नागपूर येथील अखिल नटराजम् आंतर सांस्कृतिक संघाने जागतिक पातळीवर आयोजित केलेल्या ऑनलाइन इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट 2021 या नृत्य स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाने बाजी मारली.
सीकेटी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनी श्रावणी थळे (इयत्ता सातवी), सई जोशी (इयत्ता नववी) आणि प्रणिता वाघमारे (इयत्ता दहावी) या विद्यार्थिनींनी आणि त्यांच्या इतर सहकारी नृत्यांगनांच्या समूहाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल या विद्यार्थिनींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘कोरोना काळातही नृत्याचा सराव सातत्याने करून जागतिक स्पर्धेत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या या विद्यार्थिनींचा विद्यालयाला निश्चितच अभिमान वाटतो,’ असे विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले.
यशस्वी सर्व विद्यार्थिंनीचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.