Breaking News

जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटकांसह स्थानिक नाराज

मुरूड : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागल्याने मुरूड परिसरात पर्यटक येऊ लागले आहेत. शनिवार, रविवारी व सुट्ट्यांच्या दिवशी मुरूड तालुक्यात पर्यटकांची हळूहळू गर्दी होत आहे, मात्र प्रमुख आकर्षण असलेला जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असून स्थानिक व्यावसायिकदेखील नाराज आहेत. कोरोनामुळे मार्च 2020 पासून संचारबंदी व लॉकडाऊन अशी मालिका सतत सुरू राहिल्याने मुरूडमधील पर्यटनाला ग्रहण लागले होते. पर्यटक येत नसल्याने सर्व व्यवसाय ठप्प होऊन दुकानदार, हॉटेल, लॉजिंग, समुद्रकिनारी असणारे स्टॉल, घोडेस्वार, टी सेंटर, शहाळी विक्रेते यांच्या व्यवसायाला घरघर लागली होती. सध्या कोरोनाविषयक नियम शिथिल झाले असले, तरी पर्यटक मात्र फार कमी येत आहेत. पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील व्यावसायिक सज्ज झाले आहेत. मुरूड जंजिरा पर्यटकांसाठी सुरक्षित असून येथील समुद्रकिनारा व अन्य पर्यटनस्थळांचा लाभ घेण्याचे आवाहन, हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांनी केला आहे. पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ असलेला जंजिरा किल्ला अजूनही बंद आहे. शनिवार, रविवारी पर्यटकांची गर्दी होऊ लागली असली, तरी जंजिरा किल्ला परिसरात निरव शांतता असते. हा किल्ला लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी स्थानिक बोटधारक व जलवाहतूक सोसायट्यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे, त्याला एक महिना होऊनसुद्धा जंजिरा किल्ला खुला न केल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिक नाराज आहेत. मुरूडमध्ये हळूहळू पर्यटकांची संख्या वाढत असून पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. काशीद समुद्रकिनारीसुद्धा पर्यटक येण्यास सुरुवात झाली असून, तेथील स्थानिकांचे 64 स्टॉलसुद्धा सुरू झाले आहेत. वॉटर स्पोर्ट व जंजिरा किल्ला खुला केल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यांच्या स्वागत व आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी सर्व हॉटेल व लॉजिंग सज्ज आहेत. जंजिरा किल्लासुद्धा तातडीने सुरू व्हायला हवा.
-विजय शंकर पाटील,
अध्यक्ष, हॉटेल, लॉजिंग संघटना, मुरूड

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply