Breaking News

कर्जत मालेगाव येथे दिवसाढवळ्या चोरी

साडे तीन लाखांचे सोने लंपास

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील नेरळ -कळंब राज्यमार्गावरील मालेगाव या गावाचे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या बंगल्यात घुसून रविवारी (दि. 7) दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे. त्यात तब्बल साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

मालेगाव (ता. कर्जत) चे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या मुलाचे लग्न करायचे असल्याने ते रविवारी सायंकाळी त्यांच्या पत्नीसह मुलगी बघायला गेले होते.रात्री नऊ वाजता घरी परत आल्यावर प्रकाश भोईर  यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घरात  पाहणी केल्यानंतर कपाट तोडून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नेरळ पोलिसांना  चोरीच्या घटनेची माहिती दिली. घरात कोणी नाही असे बघून अज्ञात चोरट्यांनी सोन्याची साखळी, सोन्याचा हार, तीन अंगठ्या आणि कर्णफुले असा एकूण तीन लाख 40 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. हे सर्व सोन्याचे दागिने प्रकाश पाटील यांच्या लग्न होऊन सासरी राहत असलेल्या मुलीचे आहेत.

या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात  अज्ञात व्यक्तींवर भादवी कलम 457,454, 380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भरदिवसा आणि नेरळ-कळंब रस्त्यावर वर्दळ असलेल्या भागात चोरीची घटना घडल्याने नेरळ पोलिसदेखील चक्रावले आहेत. पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्यासह घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. पुढील तपास सुरू आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply