Breaking News

सरकता जिना बंद केल्याने कर्जत रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी

येथील रेल्वे स्थानकात असलेला सरकता जिना दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, हा सरकता जिना तात्काळ सुरू करावा आणि कर्जत स्थानकात मंजूर असलेला अन्य एका सरकत्या जिन्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू करावे, अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने केली आहे. कर्जत रेल्वे स्थानकात पुणे एन्डकडे रेल्वेने बांधलेला सरकता जिना 2018 मध्ये प्रवाशांसाठी खुला केला होता. मात्र  सरकत्या जिन्यालगत असलेल्या स्वच्छतागृहामुळे तेथे जाण्याचा रस्ता निमुळता होता. तर सरकत्या जिन्याला लागून मुंबईदिशेकडे उतरणारा पादचारी पूल बनविण्यात आला आहे, तो अद्याप प्रवाशांसाठी खुला केलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून हा सरकता जिना दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे.  त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वास्तविक कर्जत रेल्वे स्थानकात एकावेळी दोन सरकते जिने मंजूर करण्यात आले होते. त्यातील दुसर्‍या सरकत्या जिन्याचे काय झाले? याबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. फलाट एकवर उभारण्यात येणारा सरकता जिना कधी उभारला जाणार, याबाबतदेखील विचारणा होत आहे. 

कर्जत रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याजवळ असलेले स्वच्छतागृह हटविण्याचे काम केले जात असल्याने सध्या सरकता जिना बंद आहे. मात्र स्वच्छतागृह बाजूला केल्यास मोठी जागा तेथे उपलब्ध होऊन त्याचा फायदा प्रवाशांना होईल.

 -प्रभाकर गंगावणे, पदाधिकारी,

कर्जत पॅसेंजर असोसिएशन

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply