पनवेल : वार्ताहर
चीनमधून आलेल्या कोविड 19 अर्थात कोरोना या विषाणूने जगभरात थैमान घातल्यानंतर त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तसेच यापासून संरक्षण करण्याकरिता केंद्र तसेच राज्य सरकारने देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले असताना या विषाणूला रोखण्यासाठी त्यासंदर्भात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सॅनिटायझर व मास्क वापरण्याबाबत आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने तळोजातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी यांनी या विषाणूबाबत गांभीर्य लक्षात घेऊन याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरता तळोजा पोलीस ठाणे यांना ए. एन 95 हे कापडी मास्क विकत घेण्यासाठी एकूण 250 मास्कसाठी एक लाख 40 हजार रुपयांची मदत व सहकार्य कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी कंपनीचे मॅनेजर सोमनाथ मलगर व कंपनी व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले. संकटाच्या काळात पोलिसांना मुंबई वेस्ट मॅनेजमेंटने दिलेला मदतीचा हात महत्त्वाचा असल्याचेही तळोजा पोलिसांनी म्हटले आहे.