तारा शर्माच्या पोस्टद्वारे शुभेच्छा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये झालेली इंग्लंडविरुद्धची चौथी व अखेरची कसोटी खेळला नाही. 28 वर्षीय बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे बुमराह स्पोर्ट्स सूत्रसंचालक संजना गणेशननशी लग्न करणार आहे. या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगले आहे, मात्र अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने सोशल मीडियावर पोस्ट करीत यावर शिक्कामोर्तब केले आहे.
तारा शर्मा सलुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जसप्रीत, तारा आणि तिची मुलं दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ताराने दिलेल्या कॅप्शनमुळे जसप्रीत आणि संजनाच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. जसप्रीत आणि संजना तुम्हाला तुमच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. तारा शर्मा शोमधील तुझ्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला दोघांना एकत्र सहाव्या पर्वात पाहण्यासाठी उत्सुक आहोत. तुझ्या संपुर्ण कुटूंबाला खूप खूप शुभेच्छा, असे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे.
जसप्रीत आणि संजना 14-15 मार्चला गोव्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या आणि जवळच्या लोकांनाच या लग्नासाठी बोलाविण्यात येणार असल्याचे समजते.