मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच मुद्द्यावरूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धारेवर धरले आहे. 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते, अशा शब्दात पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर शरसंधान साधले आहे.
तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केले. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली, असे पाटील यांनी म्हटले आहे.
त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्यात अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजप सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणार्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला.
तुम्ही मराठा समाजासाठी काय केले?
पाटील यांनी तिसर्या ट्विटमध्ये ठाकरे सरकारला सवाल केला आहे. भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवले सुद्धा पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केले ते सांगावे! सत्तांतर झाल्यानंतर भाजप सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला. राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन केले. त्या आयोगाचा अहवाल आला, त्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस मिळाली. हा कायदा हायकोर्टात टिकवला. तो टिकण्यासारखाच भक्कम बनवला. पण तुम्ही मराठा समाजासाठी काय केले?, असे पाटील यांनी महाविकास आघाडीला विचारले आहे.