पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक पुर्नवापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी बिसलेरीच्या सहकार्यातून बॉटल्स फॉर चेंज उपक्रम राबविण्यात येणार आहे. सुक्या कचर्याची पुनर्प्रक्रिया केल्यानंतर कचर्याचे मुल्य वाढते. त्यामुळे ज्या सोसायट्या 100 किलो पेक्षा जास्त कचरा प्रतिदिन निर्माण करतात. अशा सोसायटीने अशा तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यांना यातून उत्पन्नही मिळू शकेल. 18 मार्च हा पुनर्वापर दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 15) आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांचे उपस्थितीत आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते प्लास्टिक संग्रह करणार्या बिनचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असून हे टाळण्यासाठी प्लास्टिकचा पुर्नवापर करणे महत्वाचे आहे. याच उद्देशाने पालिकेने प्लास्टिक जागरूकता मोहीम सुरू केली आहे. पालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थामध्ये प्लास्टिक बाटल्या संग्रहित करण्याविषयी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. बिसलरी कंपनी या कामामध्ये पालिकेला सहाय्य करणार आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गोळा केलेले प्लॅस्टिक बिसलरी कंपनी बॉटल्स फॉर चेंज या उपक्रमाच्या माध्यमातून पुर्नवापर करून उत्पादने तयार करणार आहे. या उपक्रमासाठी महापालिकेबरोबरच अनेक सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. बिसलरीच्या श्रेया सुधीर यांनी यावेळी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, प्रवीण पाटील, अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, स्वच्छता भारत अभियानाच्या सल्लागार मधुप्रिया आवटे यांच्यासह पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.