सामनावीर पुरस्कार प्रशिक्षकांच्या वडिलांना समर्पित
मुंबई ः प्रतिनिधी
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टी-20 सामन्यात अर्थात स्वतःच्या पदार्पणाच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावून यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने सामनावीर पुरस्कार पटकावला. किशनने आपल्या 32 चेंडूंमधील 56 धावांच्या दमदार खेळीत चौकार आणि षटकारांची बरसात करीत मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकलीच, शिवाय सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यात आपल्या कृतीने असंख्य क्रिकेटप्रेमींच्याही हृदयातही स्थान मिळविले.
दुसर्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने तीन विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 षटकांत पूर्ण केले. या सामन्यात आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. संघातील आपली निवड सार्थ ठरवत त्याने 28 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. चौकार-षटकार ठोकत त्याने सुरुवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाची हवा काढली व भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. दमदार कामगिरीसाठी किशनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने हा पुरस्कार आपल्या प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पित केला.
‘माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. आजची ही खेळी त्यांच्यासाठी होती मला स्वतःला सिद्ध करायचे होते, कारण माझ्या वडिलांसाठी तुला किमान अर्धशतक तरी झळकवावेच लागेल, असे प्रशिक्षक मला म्हणाले होते. त्यामुळे मी हा पुरस्कार त्यांना समर्पित करतो, असे किशान म्हणाला. पदार्पणाच्या सामन्यातच मिळालेला सामनावीर पुरस्कार प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पित केल्यामुळे इशान किशनवर सोशल मीडियातूनही कौतुकाचा वर्षाव होतोय.