मटका फोड आंदोलनातून भाजपचा इशारा
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 25) मडका फोड आंदोलन करण्यात आले. सिडकोकडे पाण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याचे त्यांच्या अधिकार्यांबरोबर चर्चा करताना दिसून आल्याने सिडकोचा या वेळी निषेध करण्यात आला तसेच 7 मेपर्यंत नवीन पनवेल व खांदा कॉलनीत पुरेसा पाणीपुरवठा न केल्यास सिडकोच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचार्यांना आत जाण्यास मज्जाव करू, असा इशारा देण्यात आला आहे.
नवीन पनवेलमधील अग्निशमन केंद्रापासून निघालेल्या मटका मोर्चात भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज भुजबळ, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, मनपा प्रभाग अध्यक्ष वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, तेजस कांडपिळे, एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, राजश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, स्मिता वाणी, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, भीमराव पोवार, महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नाईक, राकेश भुजबळ, हेमंत भुजबळ, रमेश पोवार, प्रशांत फुलपगार, जितेंद्र वाघमारे, अॅड. किशोर धाकड, राहुल वाहुळकर, रावसाहेब खरात, मनीषा चिले, क्रांतीकुमार चितळे, किशोर शिंदे, अजित लोंढे, नारायण चव्हाण, मयुरी उनडकट, प्रीती भुजबळ, गौरी पवार, विजय खरात, योगेश आखाडे, अनंत जाधव, आरती तायडे यांच्यासह
यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सिडको कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवल्यावर सिडकोविरोधात घोषणा देत मोर्चेकर्यांनी आपल्या हातातील मटकी तेथे फोडली.
यानंतर सिडकोचे कार्यकारी अभियंता चौथानी व उपकार्यकारी अभियंता पांडुळे कार्यालायत आल्यावर त्यांनी मोर्चेकर्यांना चर्चेसाठी बोलाविले. नवीन पनवेमध्ये दोन महिन्यांपासून अनियमित, कमी दाबाने व खंडित पाणीपुरवठा होत आहे. नवीन पनवेल सेक्टर 12, 15 ए व 1मधील ओव्हरहेड पाण्याच्या टाक्या सिडकोने पाडल्या आहेत. त्या नवीन बांधण्यास मंजुरी असतानाही अद्याप का बांधल्या नाहीत याबाबत माहिती देताना अधिकारी देत असलेली माहिती थातुरमातुर असल्याचे दिसून आले. नवीन पनवेलची पाण्याची 35-36 एमएलडी मागणी असून एमजेपीकडून 31-32 एमएलडी पाणी मिळते ही चुकीची माहिती असून 42 एमएलडी पाण्याची गरज असल्याचे सर्व नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले.
सिडकोकडे पुरेसे पाणी नसताना सिडको नवीन बांधकामांना परवानगी कशासाठी देत आहे. सिडकोच्या अधिकार्यांचे फक्त भूखंड विकण्याकडे लक्ष असल्याचा आरोप या वेळी उपस्थित नगरसेवकांनी केला. नवीन बांधकामांना परवानग्या देणे बंद करा, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी उपस्थित अधिकार्यांना पाणीपुरवठ्याबाबत माहिती नसल्याचे दिसून आल्याने चर्चा थांबवण्यात आली. त्यानंतर मोर्चासमोर बोलताना 7मेपर्यंत नवीन पनवेल व खांदा कॉलनीत पुरेसा पाणीपुरवठा न केल्यास सिडकोच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचार्यांना आत जाण्यास मज्जाव करू, असा इशारा देऊन त्यासाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, असे भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी सांगितले.
नवीन पनवेल सेक्टर 12, 15 ए व 1मधील ओव्हरहेड पाण्याच्या टाक्या सिडकोने पाडल्या आहेत. त्या नवीन बांधण्याचे आश्वासन देऊनही अद्याप बांधल्या नाहीत. सिडकोने आपल्या मालकीचे मोर्बे धरण नवी मुंबई महापालिकेला देऊन पनवेलकरांची फसवणूक केली आहे. जनतेचा आक्रोश सिडकोला समजावा आणि पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा म्हणून हे आंदोलन करण्यात आले.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका
आम्ही सिडकोच्या अधिकार्यांबरोबर चर्चा करायला गेल्यावर लक्षात आले की, त्यांना किती एमएलडी पाण्याची गरज आहे याची माहिती नाही. हे आपले दुर्दैव आहे की असे अधिकारी आपल्याकडे आहेत. त्यामुळे सभागृह नेते म्हणाले त्याप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे बैठक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण 7 मेपर्यंत नवीन पनवेल व खांदा कॉलनीत पुरेसा पाणीपुरवठा न केल्यास सिडकोच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचार्यांना आत जाण्यास मज्जाव करणार आहोत. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील.
-अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक
मी नवीन पनवेल ए टाईपमध्ये राहते. आमच्याकडे सकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6.30 ते 7.30 वाजेपर्यंत नियमित पाणी येण्याची वेळ आहे, पण सध्या फक्त 10 मिनिटे पाणी येते. संध्याकाळी तर अनेक वेळा पाणी येतच नाही. फक्त फूस, फूस हवाच येते.
–सुनीता राऊत, रहिवासी