महावितरणच्या वीज तोडणी मोहिमेचा फटका
अलिबाग ः प्रतिनिधी
महावितरण सध्या वीज बिल वसुली आणि वीज तोडणी मोहीम राबवित आहे. जिल्ह्यातील 816 ग्रामपंचायतींची वीज थकबाकी असल्याने या ग्रामपंचायतींमधील दोन हजार 754 पैकी एक हजार 90 पथदिव्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत, तर 702पैकी 96 पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी गैरसोय होत असल्याने ग्रामीण भागात संतापाचे वातावरण आहे.
संपूर्ण राज्यात सध्या महावितरणने वीज बील वसुली आणि बिल न भरल्यास पॉवर कट मोहीम हाती घेतली आहे. आधी घरगुती आणि व्यावसायिक वीज कनेक्शनची वसुली मोहीम राबवण्यात आली. आता पथदिव्यांच्या वीज कनेक्शनला लक्ष्य करण्यात आले आहे. अलिबागसह पनवेल ग्रामीण, रोहा आणि गोरेगाव अशा चारही विभागात थकीत बिल वसुली आणि वीज तोडणी मोहीम राबवली जात आहे. पथदिव्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणने हाती घेतल्यानंतर रायगडातील अर्ध्याहून अधिक गावचे रस्ते अंधारात बुडाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याची चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी राज्य सरकारला पत्र लिहून पथदिव्यांचे कनेक्शन तोडण्याची मोहीम थांबवावी, अशी विनंती केली आहे. आता सरकार ही विनंती मान्य करते का याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.
वीज बिल वसुली मोहीम यापुढेही सुरू राहाणार आहे. व्यक्तीगत ग्राहकांबरोबरच आता ग्रामपंचायतींनी वीज बिले न भरल्यास त्यांचीही कनेक्शन तोडली जाणार आहेत.
-दीपक पाटील, अधीक्षक अभियंता, महावितरण
पाणी योजनांचा वीजपुरवठाही खंडित
महावितरणच्या वीज बिल वसुली आणि वीज तोडणी मोहिमेचा परिणाम ग्रामीण पाणीपुरवठ्यावरदेखील झाला आहे. 702पैकी 96 पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी महिलांना विहिरीवर किंवा हातपंपावर पाणी भरावे लागत आहे.