Breaking News

राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध

नवी नियमावली जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात कोरोनाबाधितांची वेगाने वाढणारी संख्या पाहाता अखेर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, लग्न, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी किती लोकांना परवानगी असेल आणि कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल या संदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना राज्यात लॉकडाऊन नाही, पण कठोर निर्बंध लावणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांचे उल्लंघन करणार्‍यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सुरुवात
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची सुरुवात झाली असल्याचे नमूद करून कोरोना स्थितीवर गंभीर पावले उचलली जात नसल्याची टिप्पणीदेखील केली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय समिती राज्याच्या दौर्‍यावर आली होती. त्या वेळी कोरोनाविषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतला होता. यानंतर आता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज्यात कोरोनासंदर्भातील स्थिती गंभीर असल्याचे अधोरेखित केलेे आहे. त्याचप्रमाणे नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यात फारसे परिणामकारक नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. कंटेन्मेंट झोन जाहीर करा आणि कठोर उपाययोजना करा, असे निर्देशही राज्य सरकारला दिले आहेत.

असे आहेत नवे निर्बंध?

  •  राज्यातील सर्व सिनेमागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने कार्यरत राहतील. ग्राहक आणि कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.
  •  शॉपिंग मॉल्समध्येही मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. मॉल व्यवस्थापनाने मॉलमधील सिनेमागृह आणि रेस्टॉरंट नियम पाळत आहेत याची खात्री करावी.
  • कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणांसाठी एकत्र येण्यास मनाई असेल. तसे झाल्यास ज्या जागी असे कार्यक्रम होतील, त्या जागेच्या मालकावर कारवाई केली जाईल.
  • लग्नकार्यामध्ये 50पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
  •  अंत्यविधीसाठी 20पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही.
  •  होम आयसोलेशनमध्ये असणार्‍या रुग्णांनादेखील नियम पाळावे लागतील. त्यांची माहिती आणि संबंधित डॉक्टरांची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी लागेल.
  •  होम आयसोलेशनमधील व्यक्तीच्या घराच्या दरवाजावर किंवा संबंधित जागेवर 14 दिवसांसाठी ही बाब स्पष्ट करणारा बोर्ड लावावा.
  • होम क्वारंटाईनचा स्टॅम्प संबंधित रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.
  •  होम क्वारंटाईन असणार्‍या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनीदेखील गरज असेल तरच मास्क लावून घराबाहेर पडावे.
  •  आरोग्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व कार्यालये 50 टक्के कर्मचारी क्षमतेनेच सुरू राहतील. कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  •  धार्मिक स्थळांनी संबंधित ठिकाणी येणे शक्य होणार्‍या व्यक्तींची कमाल मर्यादा जाहीर करावी. या व्यक्तींना संबंधित ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून वावर करण्यासाठी पुरेशी जागा असायला हवी. तेवढ्याच व्यक्तींना प्रतितास प्रवेश दिला जावा.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply