Breaking News

रोह्यातील चक्रीवादळग्रस्त शाळा मदतीच्या प्रतीक्षेत

धाटाव : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील 266प्राथमिक शाळांना निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला होता. त्यापैकी नुकसान झालेल्या 185शाळांना अजूनही राज्य शासनाकडून अर्थिक मदत मिळालेली नाही. गेल्या जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळात रोहा तालुक्यातील एकूण 266प्राथमिक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसात झाले होते. त्यापैकी जिल्हा नियोजन मडंळा मार्फत 81 शाळांना अर्थिक मदत मिळाली आहे. उर्वरीत शाळांना अजूनही मदतनिधी न मिळाल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही ठिकाणी ग्रामस्थांनी स्वतःचे पैसे खर्च आपल्या गावातील शाळांची दुरूस्ती करून मुलांना वर्गात बसण्याची सोय करून दिली आहे, मात्र अद्याप त्यांना खर्च केलेले पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेला मदत स्वरूपात खर्च तत्काळ मिळावा, अशी मागणी तेथील शाळा व्यवस्थापन समिती करीत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शाळांतील शिक्षकांना मुलांना शिकविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे अपुरे पडत आहेत. टेबल, खुर्ची, फर्निचर यांचेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रोहा तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये वीजेचे बिल प्रमाणापेक्षा जास्त आल्याने वीज वापरावी की, नाही  असे प्रश्न शिक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. शाळेतील नादुरुस्त झालेले संगणक, इलेक्ट्रानिक्स साहित्य दुरुस्त करण्यासाठी अर्थिक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचा लाभ घेता येत नाही. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील प्राथमिक शाळांना राज्य शासनाने व रायगड जिल्हा परिषदेने अर्थिक निधी तत्काळ उपलब्ध द्यावा, अशी मागणी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक वर्ग करीत आहे.

राजिप शाळा महादेववाडी या शाळेचे निसर्ग चक्रीवादळात तीन ते चार लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप कोणतीही अर्थिक मदत झालेली नसल्याने विद्यार्थी,शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

-प्रकाश पाटील, मुख्याध्यापक, राजिप शाळा महादेववाडी, ता. रोहा

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील 266पैकी 81शाळांना जिल्हा नियोजन मडंळाच्या माध्यमातून अर्थिक मदत दिली आहे. तर अजूनही 185शाळांना अर्थिक मदतीची गरज आहे. जिल्हा नियोजन मडंळाच्या माध्यमातून जशी मदत उपलब्ध होईल, तशी ती नुकसानग्रस्त शाळांना दिली जाईल. मात्र मदत कधीपर्यंत मिळेल, याची माहिती आम्हांला प्राप्त झालेली नाही.

साधुराम बांगारे, गटशिक्षणाधिकारी, रोहा.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply