मुरूड : प्रतिनिधी
ऑनलाइन पैसे भरुनही मुरूडमध्ये वीज मिटर मिळत नसल्याने नव्याने बांधलेली घरे मागील दोन महिन्यांपासून अंधारात आहेत. त्यामुळे मुरूड शहर व ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. मुरूडमध्ये नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. या पर्यटकांची सुविधा व्हावी, यासाठी स्थानिक नागरिक लॉजिंग अथवा एखाद्या खोलीची निर्मिती करीत असतात. शहरात दिवसागणिक घरांची निर्मिती होत असून, पुर्वी ऑनलाइन रक्कम अदा केल्यानंतर दोन दिवसांत वीज मीटर मिळत होते. मात्र आता पैसे भरुन दोन महिने उलटले तरीही नवीन वीज मीटर उपलब्ध होत नसल्याने अनेक लोक अंधारात आहेत. ते महावितरणच्या मुरुड कार्यालयात हेलपाटे घालत असून, आम्हाला मीटर कधी देणार, अशी विचारणा करीत आहेत. नवीन वीज मीटरसाठी पंधरा दिवसांपूर्वी पैसे भरूनसुद्धा मला अद्यापर्यंत वीज मीटर उपलब्ध झाले नाही, असे शहेजाद हद्दादी यांनी सांगितले. मुरुड तालुक्यात सध्या 25 हजारपेक्षा जास्त वीज ग्राहक असून, वसुलीच्या बाबतीत एक नंबर असणार्या तालुक्याला वीज मीटरपासून उपेक्षित ठेवण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे. मुरूडमध्ये वीज मीटरची टंचाई आहे. लोक येथील महावितरण कार्यालयात खेपा मारून कंटाळले आहेत. त्यांना तातडीने मीटर द्या, अशी मागणी स्टार फाऊडेशनचे अध्यक्ष जाहिद फकजी यांनी महावितरणचे रोहा येथील कार्यकारी अभियंता हुंडेकरी यांच्याकडे केली होती. यावर हुंडेकरी यांनी मुरुड कार्यालयाकडून मागणी प्रस्ताव आल्यास आम्ही त्वरित मीटर देऊ असे सांगितले.
मुरूडमध्ये वीज मीटरची टंचाई आहे. घरगुती वापरासाठी 66, व्यापारी तत्वावर वापरण्यासाठी 21, तर इतर वापरासाठी सहा वीज मीटरची मागणी आहे. ग्राहकांना लवकरात लवकर वीज मीटर मिळावे यासाठी आम्ही रोहा येथील वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून आहोत.
-सचिन येरेकर, उप कार्यकारी अभियंता, महावितरण मुरूड