इंदापूर : प्रतिनिधी
कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटकातील विजापूरपासून वीस किलोमीटर असलेल्या बेडगी या गावाकडे निघालेल्या इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या गाडीची कंटेनरशी धडक होऊन दोन जण ठार झाले, तर सहा जण गंभीर झाले आहेत. या सर्वांना विजापूरमधील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघ राज्यभरात प्रसिद्ध असून हा संघ बुधवारी (दि. 17) कर्नाटकातील विजापूर पासून जवळ असलेल्या बेडगी येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाला होता. पहाटे हे सर्व खेळाडू भवानीनगर व कळंब येथून सोलापूर रस्त्याने तवेरा गाडीने रवाना झाले. त्यानंतर पावणेसातच्या सुमारास विजापूर रस्त्यावर कंटेनरशी तवेरा गाडीची धडक होऊन त्यातील नऊ जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी महादेव आवटे (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) व सोहेल सय्यद (रा. कळंब, ता. इंदापूर) हे दोघे जण जागीच ठार झाले, तर उर्वरित सात जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्व जखमींना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली.