पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढणारी कोरोनाबाधिताची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. 18) पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची संयुक्त बैठक ऑनलाइन बैठक झाली. ही बैठक पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि पोलीस परिमंडळ 2चे उपायुयक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नियमाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभाग आणि महानगरपालिकेचे कर्मचारी संयुक्तिकरित्या कारवाई करतील, असा निर्णय घेण्यात आला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सात पोलीस स्टेशन क्षेत्रात पोलिसांसोबत पालिकेची सात भरारी पथके तयार करण्यात येणार असून ही पथके आपआपल्या विभागामध्ये नियम न पाळणार्यांवर दंडात्मक आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या कारवाई करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. तसेच बाजारसमित्या, मुख्य बाजारपेठा याठिकाणची गर्दी टाळण्यासाठी त्याठिकाणी संयुक्तिक कारवाई करण्यावर या वेळी चर्चा करण्यात आली. हॉटेल, रेस्टॉटंट, बार, आस्थापना याठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा जास्त गर्दी असेल तर अशांवरती गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच कोरानाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत या आस्थापना सील करण्यात येणार असल्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर दंडात्मक आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. सील करण्यात आलेल्या कंटेन्टमेंट झोनमधील गृह निर्माण सोसायट्यांमधील पॉझिटिव्ह तसेच लक्षणे नसलेले रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास त्यांना इंडिया बुल्स येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये जबरदस्तीने हालविण्यात येईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या बैठकीस सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खारघर येथील शत्रुघ्न माळी, तळोजा येथील काशीनाथ चव्हाण, कळंबोली येथील संजय पाटील, कामोठे येथील स्मिता जाधव, खांदेश्वर येथील देविदास सोनावणे, पनवेल शहर येथील अजयकुमार लांडगे, पनवेल तालुका येथील रवींद्र दौंडकर तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर उपस्थित होते.