Breaking News

इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

युवा खेळाडूंना संधी

मुंबई ः प्रतिनिधी
इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये काही नवीन चेहर्‍यांचाही समावेश करण्यात आला आहे. 23 मार्चपासून ही मालिका खेळवली जाईल.
भारताच्या या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपद हे रोहित शर्माकडेच आहे. सलामीसाठी या वेळी रोहितबरोबर शिखर धवन हा पर्याय असेल, पण त्याचबरोबर युवा सलामीवीर शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेत गिलला वन डेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल, असे म्हटले जात आहे.
भारताच्या मधल्या फळीमध्ये श्रेयस अय्यर आहे, त्याचबरोबर सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडविरोधातील चौथ्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक साजरे करीत सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडले. हार्दिक पांड्या आणि रिषभ पंतही जोडीला आहेत.  विजय हजारे स्पर्धेत धावांची बरसात करणार्‍या पृथ्वी शॉला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे.  
भारताच्या गोलंदाजीमध्ये एका युवा खेळाडूला पहिल्यांदाच संधी दिली गेली आहे. या युवा वेगवान गोलंदाजाचे नाव प्रसिध कृष्णन असे आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात प्रसिधला बर्‍याचदा सर्वांनीच पाहिले असेल. त्याचबरोबर भारतीय संघात या वेळी अष्टपैलू कृणाल पांड्याचे पुनरागमन झाले आहे. फिरकीपटू अक्षर पटेललाही संघात स्थान देण्यात आलेले नाही.
या संघात फिरकीची जबाबदारी युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि कृणाल पांड्या यांच्यावर, तर वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी. नटराजन आणि प्रसिध कृष्णन यांच्यावर असेल. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा या दोन्ही वेगवान गोलंदाजांना या वेळी विश्रांती दिल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), के. एल. राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply