पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. आपल्या सोसायटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नियमांचे उल्लंघन करताना दिसत असतील तर पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेजाबदारपणे घराबाहेर फिरताना दिसल्यास पालिकेच्या वतीने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकतेच खांदा कॉलनी येथील उमिया कृपा सोसायटी येथील चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरत असल्याचे समजल्यावर पोलिसांच्या मदतीने पालिकेने या रुग्णांना इंडिया बुल्स येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले.
सोसायटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नियमांचे उल्लंघन करताना दिसत असतील तर अशा रुग्णांवर पोलीस विभाग आणि पालिकेची संयुक्त कारवाई करण्यात येऊन इंडिया बुल्स येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये 14 दिवसांसाठी घेऊन जाण्यात येईल. संबधित सोसायट्यांनी जर पालिकेला कळविले नाही, तर अशा सोसायट्यांवर, त्यांच्या पदाधिकार्यांवरही नाइलाजाने कारवाई करणे भाग पडेल, असा इशारा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला आहे.
पनवेल पालिका हद्दीमध्ये काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून सातत्याने नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेण्यास सांगत आहे. वारंवार यासाठीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असतानादेखील काही पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडताना दिसत आहे. नुकतीच पालिकेची आणि पोलीस विभागाशी बैठक झाली असून या बैठकीमध्ये यापुढे आता कोरोनाशी संबधित कारवाई ही संयुक्तपणे केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड 19 गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी खालील नियम बंधनकारक असतील. यामध्ये कोरोना संक्रमित रुग्णाची गृह विलगीकरणाची शिफारस करणार्या खाजगी वैद्यकिय व्यावसायिकावर (डॉक्टर) या रुग्णाची आरोग्याची संपूर्ण जबाबदारी राहील. शिफारस केलेल्या डॉक्टरने रुग्णाची दैनंदिन तपासणी करणे बंधनकारक असेल. तसेच वेळावेळी महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागास रुग्णाच्या आरोग्याची माहिती कळविणे बंधनकारक असेल.
कोरोना संक्रमित रूग्णाने गृह विलगीकरणाचा पर्याय निवडताना ज्या खाजगी वैद्यकिय व्यावसायिकाच्या (डॉक्टर) पर्यवेक्षणाखाली उपचार घेणार असेल, अशा डॉक्टरची माहिती महापालिकेस सादर करणे बंधनकारक असेल. रुग्णांच्या कुटूंबातील व्यक्तींनी किंवा सहवासीतांनी किंवा संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची कोरोना चाचणी रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर तत्काळ करून घ्यावी. तसेच त्यांनी सात दिवस घरातच रहाणे बंधनकारक आहे. पहिल्या दिवशी जर चाचणी निगेटिव्ह आली असेल तर पाचव्या दिवशी आपली पुन्हा चाचणी करून घेणे आवश्यक आहे. रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का वैद्यकिय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्राने मारावा.
नियमांचे उल्लंघन केल्यास रुग्णाला महापालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.