Breaking News

अलिबाग एसटी आगाराचे नूतनीकरण रखडले

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबाग एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम फेब्रुवारी 2021पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र मुदत संपली तरी बसस्थानकाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2019 रोजी अलिबाग एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरण कामाचा नारळ फोडण्यात आला होता, मात्र कामाला सुरुवातही होऊ शकली नाही. साडेसहा कोटी रुपये खर्चून या बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार होते. यात पुणे येथील डिरोक्ट्रीक इंजिनीअरिंग कंपनीकडून बसस्थानकाचा आराखडा तयार करण्यात आला होता. तळमजला आणि पहिला मजला असे बांधकाम केले जाणार होते. यात 14 फलाटांचे बसस्थानक, प्रतीक्षालय, उपाहारगृह, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, बसस्थानक कार्यालय, वाहक आणि चालकांसाठी विश्रातीगृह, पार्सल खोली यांसारख्या सुविधांचा समावेश होता. एक लाख प्रवाशांची ये-जा करता येईल अशा पद्धतीने बसस्थानकाची उभारणी  केली जाणार होती. याअंतर्गत सात हजार 530 चौरस फुटांचे बांधकाम करण्यात येणार होते. बसस्थानकाचे काम फेब्रुवारी 2021पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र  मुदत संपली तरी कामाला सुरुवात होऊ शकली नाही. बसस्थानकाच्या कामासाठी शासनाने निविदाही मागविल्या होत्या. त्या सप्टेंबर 2019मध्ये उघडण्यात आल्या. नंतर या निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आल्या. तेव्हापासून आजतागायत त्या निविदा मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply