आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; खोपोलीत रोहिदास पाटील, निर्मला पाटील यांची प्रथम पुण्यतिथी
खोपोली : प्रतिनिधी
सार्वजनिक जीवनात वावरताना जनसामान्यांच्या प्रश्नांना कशाप्रकारे न्याय देता येईल, असा ध्यास रोहिदास पाटील यांनी घेतला म्हणून, गेली पस्तीस वर्षे नगरपालिकेत लवजी गावाचे ते प्रतिनिधित्व करत होते, सामाजिक, शैक्षणिक, राजकारण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान नेहमीच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 30) लवजी खोपोली येथे केले.
खोपोली नगरपालिका हद्दीतील लवजी या गावी भाजपचे नेते तथा माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील व माजी नगरसेविका निर्मला पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात आमदार ठाकूर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोविड काळात अनेक चांगल्या कार्यकर्त्यना आपण मुकलो. रोहिदास पाटील व निर्मला पाटील यांनी माणसे जोडण्याचे काम केले. त्यांचे सामाजिक व जनहिताचे काम आपण पुढे सुरू ठेवू, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, सुनील पाटील, माजी नगरसेवक मोहन अवसरमल, व्हिडिओ स्कूल चेअरमन उल्हासराव देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बंधू पाटील, नरेश पाटील, अभियंता अशोक पाटील, अॅड. राजेंद्र येरूणकर, ग्रामस्थ जयवंत मडपे, निलेश थरकुडे इत्यादीनी रोहिदास पाटील व निर्मला पाटील या दाम्पत्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
माजी आमदार देवेंद्र साटम, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे, बेबीशेठ सॅम्युएल, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, रमेश जाधव, खालापूर पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील, केटीएसपी मंडळ अध्यक्ष संतोष जंगम, सचिव किशोर पाटील, माजी नगरसेवक मंगेश दळवी, नितीन मोरे, राजू गायकवाड, हरीश काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या श्रद्धांजली सभेला उपस्थित होते.
श्रद्धांजली सभेपूर्वी हभप कृष्णा महाराज तांबे यांचे प्रवचन झाले, प्रवचनात लांबे महाराजांनी पर्यावरण हा विषय लावून धरला व आगामी काळात प्रत्येक नागरिकांनी पाच झाडे लावण्याचा संदेश दिला. पसायदानाने श्रद्धांजली सभेची सांगता झाली.
RamPrahar – The Panvel Daily Paper