Breaking News

उल्हास नदीवरील दहिवली पुलाला भगदाड

कर्जत : बातमीदार
तालुक्यातील उल्हास नदीवरील दहिवली-मालेगाव पुलावर गुरुवारी (दि. 28) रात्री मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे पुलावरून मोठी गाडी जाण्यास अडथळे येत आहेत. या खड्ड्यात झाडाच्या फांद्या तोडून उभ्या केल्या आहेत.
नेरळ-कळंब राज्यमार्गावरील दहिवली-मालेगाव येथे उल्हास नदीवर 1970च्या दशकात हा पूल बांधण्यात आला. कमी उंचीच्या आणि 150 मीटर लांब असलेल्या या पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात पाणी वाहत असते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ अडकून पडतात. या ठिकाणी नव्याने जास्त उंचीचा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षे केली जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून नवीन पुलाच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. त्याचा फटका गतवर्षी स्थानिक वाहनचालकांना बसला होता.
दहिवली-मालेगाव येथील उल्हास नदीवरील या पुलाला गुरुवारी रात्री मोठे भगदाड पडले आहे. स्थानिक रिक्षा संघटनेचे पदाधिकारी श्रावण जाधव यांनी या मोठ्या भगदाडामुळे पुलावरून मोठी वाहने जाण्यास अडथळे येत असल्याचे सांगितले. वाहनचालकांचे लक्ष जावे यासाठी त्यांनी या खड्ड्यात झाडाच्या फांद्या तोडून उभ्या केल्या आहेत. रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय हजारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क करून दहिवली-मालेगाव पुलावर पडलेल्या भगडादाची माहिती घेण्याची सूचना केली.
दरम्यान, पुलावर पडलेल्या भगदाडाबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्जत येथील उपअभियंता संजीव वानखेडे यांना चांगलेच खडसावल. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचार्‍यांनी ते भगदाड खडी टाकून बुजवले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply