Breaking News

बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या मी सोबत आहे -आमदार महेश बालदी

उरण : वार्ताहर

तुमचा मी सहकारी आहे. हे आंदोलन आम्हाला वेदना देणारे आहे. बेमुदत धरणे आंदोलन जास्त दिवस चालणार नाही. आपण लवकरच संघर्ष संपवू. बेमुदत धरणे आंदोलन पूर्ण तडीस नेण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांना दिले. भेंडखळ येथील बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी (दि. 21) करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा देताना ते बोलत होते.

तसेच आमदार महेश बालदी पुढे म्हणाले की, खारघर येथे सोमवारी (दि. 22) बीपीसीएल अधिकार्‍यांसोबत बैठक आहे. ते पाहा न्याय नाही मिळाला तर आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सोबत बीपीसीएल वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक लाऊन न्याय उर्वरित प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करू.

या वेळी आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत घरत, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, युवा सरचिटणीस रायगड जिल्हा दीपक भोईर, युवा सरचिटणीस शेखर तांडेल, प्रदीप नाखवा, मिलिंद पाटील, माजी सरपंच लक्षमण ठाकूर, प्रदीप पाटील, अनिल ठाकूर, सुरेश ठाकूर, अनिल पाटील, किशोर भगत, समीर भोईर, चेतन पाटील, हरेश ठाकूर, नरेश पाटील, महेश ठाकूर, ग्रामस्थ, आजी माजी सरपंच, प्रकल्पग्रस्त आदी उपस्थित होते.

उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (दि. 15) पासून गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत 30 वर्षांपूर्वी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या प्रकल्पासाठी भेंडखळ, बोकडवीरा, आदी गावातील सुमारे 300 शेतकर्‍यांच्या 207 हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेल्या आहेत. जमिनी संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना वारेमाप आश्वासने देण्यात आली होती. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे, मात्र आजतागायत 300 प्रकल्पग्रस्तांपैकी फक्त 150 लोकांनाच नोकर्‍या मिळाल्या आहेत. उर्वरित प्रकल्पबाधीतांनाही प्रकल्पात नोकर्‍या देण्याच्या मागणीसाठी मागील 30 वर्षांपासून बीपीसीएल विरोधात प्रकल्पग्रस्तांचा जोरदार संघर्ष सुरू आहे.

बीपीसीएल प्रशासनासोबत अनेकदा निवेदन, चर्चा, बैठका पार पडलेल्या आहेत. निदर्शने, मोर्चे, आंदोलनही करण्यात आली आहेत, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पदरी आश्वासनांशिवाय काहीही हाती लागले नाही. बीपीसीएल कंपनी प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, या बेमुदत धरणे आंदोलनाला उरणमधील विविध सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply