कर्जत ः प्रतिनिधी
एक वर्ष कोरोनाशी सामना करता करता जनतेच्या नाकीनऊ आले. गेल्या महिन्यात कर्जत तालुका कोरोनामुक्तही झाला होता. त्यामुळे कोरोना जाईल असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे सर्वच कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन साखरपुडा, लग्न तसेच अन्य सोहळे, समारंभांची रेलचेल सुरू झाली. हजारापर्यंत उपस्थितांची संख्या गेली. असे समारंभ सर्रास सुरू आहेत. शाळा, महाविद्यालये सुरू झाली. विद्यार्थ्यांनासुद्धा भीती राहिली नाही. शाळेपर्यंत बिनधास्त विनामास्क येतात व शाळेच्या आवारात शिरताना खिशातून मास्क काढून तोंडाला लावतात. नियम केवळ कागदावरच आहेत. त्याचाच परिणाम म्हणून कोरोना वाढू लागला आहे, मात्र त्याचे गांभीर्य कर्जतकरांना नाही. गेल्या आठवड्यात 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोविशिल्ड लस देणे सुरू असले तरी प्रत्येकाला लस देण्यात किती महिने लागतील हे सांगता येत नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणांनी अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. सुरुवातीला भयभीत झालेले लोक लॉकडाऊन उठले आणि बिनधास्तपणे वागू लागले. साखरपुडे, लग्नसमारंभ, स्वागत समारंभ अशा गर्दीच्या सोहळ्यांचे आयोजन होऊ लागले. लग्न बाजूलाच पण साखरपुड्यालासुद्धा आठशे-हजार माणसे जमू लागली. विशेष म्हणजे या समारंभात मिरवताना अनेकांना मास्कची आठवण नव्हती किंबहुना तो अडचणीचा ठरत होता. सोशल डिस्टन्सिंग तर दूरच राहिले. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनामुक्त झालेला कर्जत तालुका पुन्हा कोरोनाग्रस्त होण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने नवीन निर्बंध आणले आहेत. नियम जाहीर केले आहेत, परंतु त्याचे हवे तसे गांभीर्य कुणालाच नाही. खरंतर समारंभांनंतर कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्ती अनेक घरांत आहेत, मात्र ते सरकारी दवाखान्यात जाण्यापेक्षा खासगी डॉक्टरांकडे जातात आणि औषधे घेतात. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण असूनदेखील सरकारी दप्तरी त्याची नोंद होत नाही ही वस्तुस्थिती आहे. कर्जत बाजारपेठेतील व्यापारी, भाजी विक्रेते, फेरीवाले किंवा रस्त्यावर आठवडा बाजारात व्यवसाय करणारे किती जण मास्कचा वापर करतात याकडे कुणाचेच लक्ष नाही. गेल्या वर्षी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असताना 80 टक्के लोकांना भीती वाटत होती. आता 20-22 रुग्ण एकाच दिवशी सापडले तरी दोन टक्के लोकसुद्धा भीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. काहींचा कोविशिल्ड लस आल्यामुळे कोरोनाबद्दलचा फाजिल विश्वासही वाढला आहे. अशा वर्तणुकीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढून तालुका पुन्हा कोरोनाग्रस्त होण्यास सुरुवात झाली आहे. ही कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला कोरोना रोखण्यात कर्जतकर यशस्वी झाले, परंतु त्यानंतर काही घटनांमुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होऊन आतापर्यंत 103 जणांचे बळी गेले. त्यामध्ये लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, पत्रकार यांच्याबरोबरच सर्वसामान्य माणसांचा समावेश आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी त्या वेळी सारे जण अगदी सतर्क होते. ज्या इमारतीत कोरोना रुग्ण सापडला होता तेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून फलक होते. फवारणी केली जायची. घरोघरी जाऊन तपासणी मोहीम राबविण्यात आली होती, पण काही दिवसांनी हे सारे बंद झाले. आता पुन्हा हे सारे सुरू झाले पाहिजे. कोरोनाची लक्षणे असूनही कित्येक जण ती लपवतात. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून पुन्हा घरोघरी तपासणी मोहीम राबविल्यास कोरोनाला रोखण्यात नक्कीच यश येईल.