Breaking News

शासकीय जमिनीवरील खारफुटीची कत्तल

उरणच्या मोठी जुई येथील प्रकार; यंत्रणेचे दुर्लक्ष

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील मोठी जुई गावाच्या हद्दीतील खाडीकिनारी खारफुटीची कत्तल करून सरकारी जमीन हडप करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यास विरोध करणार्‍या एका सामाजिक कार्यकर्त्यास जमीन हडप करणार्‍या टोळीने बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणात उरण तहसील कार्यालयातील एका माजी अधिकार्‍याचे नाव पुढे येत आहे, तसेच खारफुटीची कत्तल करणार्‍या टोळीवर उरण तालुक्यातील वन खाते मेहेरबान असून ते कोणतीही कारवाई करीत नसल्याने या जमीन हडप प्रकरणातील गोलमाल काय, असा सवाल येथील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. 

 तालुक्यातील मौजे मोठी जुई हद्दीतील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात शासकीय पड जमीन आहे. सद्या या जमिनीवर खारफुटीची जंगले निर्माण झाली आहेत. उरण पूर्व भागातील जमिनींना सद्या सोन्याचा भाव आला असल्याने या शासकीय जमीनीवर कब्जा करण्यासाठी उरण तहसील कार्यालयातील एका माजी सनदी अधिकार्‍याने गावातील काही टवाळ पोरांना हाताशी धरून एक टोळी निर्माण केली आहे. या टोळीने अधिकार्‍याच्या निर्देशाने या शासकीय जमिनीवर असलेले खारफुटीची बिनधास्त कत्तल केली आहे.

या खारफुटीच्या कत्तलीबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील याने उरणच्या वन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे, मात्र या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याने खारफुटीची कत्तल करणारे राजरोसपणे वावरत आहेत. उलट पक्षी या टोळक्याने तक्रारदारालाच जबर मारहाण करीत खारफुटीच्या कत्तलीबाबत आवाज उठवणार्‍याचे तोंड बंद केले आहे. वनविभागाच्या अधिकार्‍याने खारफुटीच्या कत्तलीबाबत पंचनामे करण्यासाठी ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनाच पंच म्हणून नेले असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये वनविभागाच्या अधिकार्‍यांचा हात तर नाही ना, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

एक माजी सनदी अधिकारी नियोजितपणे खारफुटीची कत्तल करून शासकीय जमीन हपडण्याचा प्रयत्न करीत असतानाही कुठलीही कारवाई न होता शासकीय यंत्रणा सुस्त बसली आहे. या सरकारी जमीन हडप प्रकरणाचे गोलमाल काय, अशी चर्चा संपूर्ण उरण पूर्व विभागातील गावागावात रंगू लागली आहे.

आम्ही तेथील क्षेत्र वनपाल यांच्या मार्फत चौकशी सुरू केली आहे. कार्यालयीन मी स्वतः कामात व्यस्त असल्या कारणाने आलेला अर्ज नजरेत आला नाही. अर्ज पाहिल्यावर कारवाईबाबत भूमिका स्पष्ट होईल.

-शशांक कदम, उरण तालुका वनाधिकारी

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply