आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले घरांचे सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही याबाबतचे पत्र देण्यात आले असल्याची माहिती आमदार म्हात्रे यांनी दिली.
आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील घरांचे सिटी सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड मिळणेबाबतचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून या सिटी सर्वेक्षणास बेलापूर गावातून सुरुवात करण्यात आली होती. अर्धेअधिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर काही समाजकंटक लोकांच्या विरोधामुळे हे सर्वेक्षण बंद करण्यात आले. त्यानंतर सिटी सर्वेक्षण मे. टेक्कोम अर्बन मॅनेजमेंट कन्सल्टंस अॅण्ड सर्व्हिस प्रोवायडर्स या एजन्सीमार्फत 7 मार्च 2020 पासून दिवाळे, सारसोळे व सानपाडा या गावठाण क्षेत्रातून सुरू करण्याचे जिल्हाधिकारी ठाणे यांनी आदेश देऊनही आजपर्यंत सिटी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आलेली नाही. याबाबत पाठपुरावा केला असता कोरोना लॉकडाऊनमुळे सिटीसर्वेक्षणास सुरुवात होऊ शकली नाही, असे कारण मिळाले. परंतु सद्यस्थितीत शासनाचे सर्व नियम पाळून सिटीसर्वेक्षण सुरू करण्यास हरकत नसल्याने पुढील कार्यवाही केल्यास उचित होईल.
जनआंदोलनाचा इशारा
विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षणाबाबत ग्रामस्थांमध्येही संभ्रम निर्माण होत असून सिटी सर्वेक्षणास सुरुवात झाली नाही तर एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जनआंदोलन करण्यात येण्याचा इशारा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.