शॉपिंग मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्ससाठी पनवेल मनपा आयुक्तांचा इशारा
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्तांनी या क्षेत्रातील कोरोना नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः शॉपिंग मॉल आणि डिपार्टमेंट स्टोअर्सनी नव्या नियमानुसार काम केले नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच ते पूर्ण बंद केले जातील. उद्याने आणि मैदाने ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहित्य पूर्ण बंद राहील. तसेच मास्क, सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील, असा इशारा पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नव्या आदेशाद्वारे दिला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आयुक्त विविध घटकांशी सातत्याने संपर्कात राहून कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन करीत आहेत. विशेषतः शॉपिंग मॉल्स आणि डी मार्ट, स्टार बाजार, रिलायन्स फ्रेश यांसारख्या डिपार्टमेंट स्टोअरसाठी त्यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. शॉपिंग मॉल्स आणि डिपार्टमेंट स्टोअरमध्ये मास्कशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, तापमान तपासूनच प्रवेश दिला जावा, ताप किंवा तापसदृश्य लक्षणे आढळल्यास प्रवेश देऊ नये, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, यासाठी पुरेसे मनुष्यबळ व्यवस्थापनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
डिपार्टमेंट स्टोअरर्समध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात यावा. याबरोबरच शॉपींग मॉलमध्ये दर शुक्रवारी सायंकाळी 4 वाजल्यानंतर शनिवार आणि रविवारी येणार्या प्रत्येकाची अॅण्टीजन कोविड चाचणी बंधनकारक राहील. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पहिल्या दोन वेळा प्रत्येकी 25 हजारांचा दंड आकारला जाईल, तर तिसर्यावेळी नियम उल्लंघन करणार्या शॉपिंग मॉल/ डिपार्टमेंट स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
सेंट्रल पार्क वगळता उद्याने आणि मैदाने सकाळी 5.30 ते सकाळी 10 वाजेपर्यंत खुली राहतील, पण यामध्ये ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहित्य पूर्ण बंद राहील. तसेच मास्क, सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.
गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे करण्याचे निर्देश
पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुड फ्रायडे आणि इस्टर संडे हे सण साजरे करतानाही कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.
गुड फ्रायडे व इस्टर संडेला चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आयुक्तांनी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चर्चमधील जागेनुसार प्रार्थना सभेच्या उपस्थितीचे नियमन करणे बंधनकारक आहे. मोठा चर्च असल्यास 50 तर लहान चर्चमध्ये 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभा आयोजित करण्यात याव्यात. सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी चार ते पाच खास सभांचे आयोजन करावे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. चर्चच्या व्यवस्थापकांनी ऑनलाइन सभेची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्याची माहिती सामाजिक माध्यमांद्वार प्रसारित करावी.
चर्चबाहेर अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळावे. गर्दी आकर्षित करेल, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम, मिरवणुकांचे आयोजन करू नये. शासन, महापालिका आणि संबंधित विभागांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.