Breaking News

रवींद्रनाथ ओव्हाळ यांचे उपोषण स्थगित

परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणासह इतर मागण्यांसाठी रिपाइं रायगड जिल्हा सचिव रवींद्रनाथ ओव्हाळ पाली बसस्थानकात सोमवारी (दि. 22) दुपारपासून आमरण उपोषणास बसले होते. याची दखल घेत परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. 26) दुपारी पाचव्या दिवशी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

या आंदोलनाला दिवसेंदिवस जनमानसातून पाठिंबा वाढत होता, शिवाय परिवहन महामंडळाच्या कारभाराविरोधात असंतोष वाढत होता. संतप्त आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोकोचा इशारा दिल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता होती, मात्र परिवहन महामंडळ अधिकार्‍यांनी समन्वयाची भूमिका साधून योग्य तोडगा काढला. विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, रायगड पेण यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, बसस्थानकाची इमारत बांधकामास राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयातून दिनांक 2 जानेवारी 2017 रोजी आर्किटेक्ट प्लॅनवेल यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामाचे नकाशे मध्यवर्ती कार्यालयाने मंजूर केल्यावर कामाचे अंदाजपत्रक तयार करून दिनांक 17 डिसेंबर 2018 रोजी कामाच्या निविदा मागविण्यात आल्या. या निविदांपैकी मे. अझिज अँड असोसिएट्स प्रा. लि. यांची निविदा राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयाकडून 10 जून 2019 रोजी मंजूर करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराकडून बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण बांधकामास दोन कोटी 36 लाख 58 हजार 406 एवढ्या रकमेस मंजुरी मिळाली आहे.

यातील पहिला टप्पा एक कोटी 50 लाख रुपयांचा निधी राज्य परिवहन महामंडळाकडे जमा झाला आहे. उर्वरित निधी कामाच्या प्रगतीनुसार महामंडळाकडे जमा होईल. हे तोडकाम पूर्ण झाल्यावर एका महिन्यात नवीन बांधकाम सुरू करण्यात येईल व दोन वर्षांत काम पूर्ण करण्यात येईल. तसेच बसस्थानकात महिला व पुरुष शौचालयाची सोय करण्यात आली असून त्यास नियमित पाणीपुरवठा होईल याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात येईल. पाली येथील खेडेगावातील बसची वाहतूक नियमित वेळेनुसार सुरू करण्यात येईल आदी मागण्यांची पूर्तता करण्यात आली आहे.

या वेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विकास माने, अभियंता रोहिदास,  तहसीलदार दिलीप रायन्नावार, पोलीस निरीक्षक विजय तायडे, रिपाइं सुधागड तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, सु. ता. बौ. पंचायत मध्यवर्ती कमिटी अध्यक्ष दीपक पवार, कार्याध्यक्ष भगवान शिंदे, युवाध्यक्ष निशांत पवार, सचिव आदेश कांबळे, रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, विनोद भोईर, परेश शिंदे, सतीश गायकवाड, राहुल महाडिक, सुशील गायकवाड, दिलीप मोरे, हेमंत गायकवाड, विजय वाघमारे, यशवंत गायकवाड, मिलिंद शिंदे, नितीन पडवळ आदी उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply