सिमेंट काँक्रिटची भिंत टाकण्यास सार्वजनिक बांधकाम खात्यास पडला विसर
मुरूड : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे मुरूड-मुंबई रस्त्यावरील विहूर पूल वाहून गेला होता. या पुलाला सिमेंट काँक्रिटची भिंत बांधणे आवश्यक असतानासुद्धा मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त मातीचा भराव टाकून सदरचे काम आटोपले आहे. त्याबद्दल प्रवासी व नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुरूड हे पर्यटन स्थळ असल्याने येथे हजारोच्या संख्येने गाड्यांची वाहतूक सुरू असते. मुरूड-मुंबई या मुख्य रस्त्यावरील वहूर येथील पूलाची दगडी संरक्षक भिंत गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात मातीसह वाहून गेली होती. त्यावेळी या पुलावरील वाहतुकसुध्दा काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार्या या पूलाच्या संरक्षक भिंतीला फक्त मातीचा भराव टाकून मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत जुजबी काम करून आपली जबाबदारी झटकली आहे. दरम्यान, विहूर पुलाला काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अलिबाग येथील कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेव यांनी सांगितले.