Breaking News

पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा…

पनवेल : प्रतिनिधी

आता पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा… लॉकडाऊनच्या नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो. अलिकडच्या काही दिवसात धार्मिक, कौटुंबिक, सणासुदीच्या कार्यक्रमातही शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुचनांचे पालन नागरिक करीत नसल्याने पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. 10 मार्च 2020 रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले, गेल्या वर्षभरात मधल्या काळात कोरोनाच्या रुग्ण वाढीचा आलेख दररोज 300पर्यंत वरती जाऊन दररोज 25 पर्यंत खाली आला होता, मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीत लॉकडाऊन होणार अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे घाबरलेल्या विद्या थोरात आता पुन्हा, लॉकडाऊन नको रे बाबा असे म्हणत आहेत. विद्या थोरात या नवीन पनवेलमध्ये राहतात. पनवेलमधील रेडिमेड गारमेंट्सच्या दुकानात सध्या त्या नोकरी करतात. मार्च 2020 मध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन झाला. त्यावेळी त्या कामोठ्यात नोकरी करीत होत्या. घरात एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा एका खाजगी कंपनीत कामाला होता. मुलगी शाळेत शिकत आहे. तुटपुंज्या पगारावर त्या घर चालवीत होत्या. कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्याने देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी घरात सामान ही भरलेले नव्हते. दुकान बंद झाल्याने नोकरी ही गेली. मुलाचा ही पगार बंद. काही दिवसातच घरातील शिल्लक ही संपली. कोणा समोर हात ही पसरू शकत नाही. घरात काही शिल्लक नसल्याने खायचे वांदे झाले. ते दिवस आठवले की अंगावर शहारे येतात हे सांगताना ही त्यांच्या आवाजातील कंप आणि पाणवलेले डोळे त्या परिस्थितीची जाणीव करून देतात. विद्या थोरात या मूळच्या पेण तालुक्यातील असल्याने आधार कार्डवर ही तेथील पत्ता होता. रेशन कार्डवरील नाव कमी करून आणले होते. पण पतीच्या निधनामुळे पनवेलमध्ये नवीन कार्ड काढायचे राहून गेले. त्यामुळे शासनाची किंवा इतर सामाजिक संस्थांची कोणतीही मदत पोहचलीच नाही. हळूहळू बाजारात दुकाने उघडली, पण हातात पैसेच नाहीत तर करणार काय असा प्रश्न पडलेला. मैत्रिणींनी काही दिवस मदत केली. जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्यावर पनवेलमध्ये नोकरी मिळाली. आता कोठे जनजीवन पूर्व पदावर येऊ लागले आहे. लोकांचे पैसे अजून द्यायचे आहेत. मुलीची शाळेची फी भरायची आहे, नाहीतर तिचा निकाल मिळणार नाही अशी अनेक टेंशन समोर असताना आता पुन्हा लॉकडाऊन झाला तर आमच्या सारख्यांनी करायचे काय असा प्रश्न पडला आहे.

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली तर आमची मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या कोणतीही तयारी नाही. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क वापरावा, सावधगिरी बाळगून आपण या कोरोनाला टाळूया.

-विद्या थोरात

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply