Breaking News

उरण भेंडखळच्या बीपीसीएल; प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश

उरण : प्रतिनिधी

बीपीसीएल प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना सोसायटी बनवून प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्याचे मान्य केले आहे. या बैठकीत परमनंट कामगारांचे काम जे बाहेरचे कान्ट्रॅक्ट लेबर्स करतात ते सर्व काम प्रकल्पग्रस्त सोसायटीच्या माध्यमातून करतील असे बैठकीत ठरविण्यात आले. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या पाठिंब्याने करण्यात आलेल्या उपोषणाला अखेर यश आले आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत बीपीसीएल ही केंद्र सरकार पुरस्कृत कंपनी कार्यरत असून बीपीसीएलने या प्रकल्पासाठी भेंडखळ गावातील 207 एकर जमीन संपादीत केली. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्तांना नोकरी व इतर आश्वासने देण्यात आली होती, मात्र स्थानिक बेरोजगार नोकरीपासून वंचीत होते. बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी कंपनी प्रशासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला पण बीपीसीएल कंपनी प्रशासनाकडून कोणतेही योग्य असा प्रतिसाद मिळाला नव्हता. भेंडखळ गावातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना या कंपनीने कामावर रुजू करून घेण्यास विरोध दर्शविल्याने आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भेंडखळचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्तांनी बीपीसीएल गेटसमोर फिजिकल, सोशल डिस्टन्स पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून बेमुदत उपोषणाला 15 मार्च 2021 पासून सुरुवात केली होती. बैठकीत प्रकल्पग्रस्तांतर्फे प्रशांत पाटील, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत, उरणचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र बूधवंत, भेंडखळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण ठाकूर, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल ठाकूर, बीपीसीएल टर्मिनल मॅनेजर सेंथिल आर, सुनिल कांबरे उपस्थित होते.

कंपनीकडून मागण्या मान्य

बीपीसीएल कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने भेंडखळ प्रकल्पग्रस्तांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला आहे. खर्‍या अर्थाने हा प्रकल्पग्रस्तांचा विजय असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत भेंडखळ, ग्रामस्थ मंडळ भेंडखळ व भेंडखळ गावचे ग्रामस्थ, सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेतेमंडळी, विविध सामाजिक संस्था संघटना, युवा वर्ग यांनी प्रचंड मेहनत घेतली. आंदोलनकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply