मुंबई ः प्रतिनिधी
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-1 असा विजय संपादन केल्यानंतर आता सर्वांना आयपीएलच्या 14व्या हंगामाचे वेध लागले आहेत. 9 एप्रिल ते 30 मेदरम्यान आयपीएलचे सामने रंगणार आहेत. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडू आपापल्या फ्रेंचायझीकडे निघाले आहेत. सोमवारी कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडूही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाले आहेत.
मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. हे तीन खेळाडू मुंबईत आल्याचे संघाने सांगितले. भारताचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे. देशासाठी खेळणे हे माझ्यासाठी स्वप्न होते. दमदार संघाचा भाग होता आल्यामुळे मला चांगले वाटत आहे. आता माझी ती भूमिका संपली असून मी आता मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात परतलो आहे, असे सूर्यकुमारने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेद्वारे सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात सूर्यकुमारने शानदार खेळी करीत सर्वांचे लक्ष वेधले. या कामगिरीमुळे त्याची वन डे संघातही निवड झाली, मात्र त्याला एकही सामना खेळता आला नाही. कृणाल पांड्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत वेगवान अर्धशतक झळकावत पदार्पण केले, तर शेवटच्या वन डेत हार्दिकने 64 धावांची खेळी करीत भारताच्या विजयात योगदान दिले. मुंबईचा पहिला सामना 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्सशी चेन्नईत होणार आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …