‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा गौरव
सातारा ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन, डॉ. पतंगराव कदम सभागृह नामकरण सोहळा आणि सायन्स विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 5) झाले. या सोहळ्यात त्यांनी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, संस्थेचे व्हाइस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, मध्य विभाग सल्लागार मंडळाचे चेअरमन संजीव पाटील, डी. पी. भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आपल्या भाषणात खासदार शरद पवार म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कष्ट करून कमाविलेले पैसे समाजासाठी देतात. न मागता दरवर्षी कमीत कमी पाच कोटी रुपये संस्थेला देतात ही साधी गोष्ट नाही. उपेक्षित समाजाला शैक्षणिक संधी देऊन त्यांच्या उत्कर्ष साधण्याची भूमिका त्यांनी आयुष्यभर घेतली. त्यांचा आदर्श तुमच्या सगळ्यांसमोर आहे. आज ते या कार्यक्रमाला आले याचा मला आनंद आहे. अन्य मान्यवरांनीही विचार मांडले.