नगर परिषदेचा प्रकल्प फायद्यात राहणार
कर्जत : बातमीदार : माथेरानमध्ये जाहिरातीचे फलक लावून शहर विद्रुप केले जात होते. त्यावर पर्याय म्हणून नगर परिषदेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डिजिटल स्क्रीन लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण थांबणार असून, नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नगर परिषद प्रशासनामार्फत डिजिटल स्क्रीन ही संकल्पना समोर आणून, बॅनरमुळे होणार्या विद्रुपीकरणाला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यात हा उपक्रम पहिल्यांदाच सुरू केला असून, या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
या डिजिटल स्क्रीनचे अनावरण मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत, नगरसेवक नरेश काळे, शकील पटेल यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या स्क्रीनवर जाहिराती प्रसिध्द करण्यात येणार असून एकूण चार ठिकाणी या स्क्रीन बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून येथील हात रिक्षा, घोड्यांचे पॉईंट्स कडे जाण्यासाठी दर लावण्यात येणार असल्याने पर्यटकांना खूपच सोयीस्कर होणार आहे. अनेकदा नवख्या पर्यटकांना खोटे पॉईंट्स दाखवून त्यांची दिशाभूल तसेच फसवणूक केली जात होती त्यालाही यामुळे आळा बसणार आहे. अत्यंत माफक दरात जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार असल्याने नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात साहजिकच या निमित्ताने भर पडणार आहे.
बॅनरसाठी लागणार्या पैशांच्या तुलनेत खूपच कमी खर्चात डिजिटल स्क्रीनवरून जाहिराती प्रसिध्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील बाजारपेठमध्ये होत असलेल्या बॅनरबाजीला लगाम लागणार आहे. शहरात स्वच्छता दिसणार आहे.
-रामदास कोकरे, मुख्याधिकारी, माथेरान नगर परिषद