Breaking News

कोरोनामुळे होळीसह धुळवड बेरंग

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात होळीचा सण पारंपारीक आणि साध्या पदधतीने साजरा करण्यात आला. रविवारी होळीचे दहन केल्यानंतर सोमवारी सर्वत्र धुळवड साजरी करण्यात आली. या दोन्ही उत्सवांवर कोरोनाचे सावट पहायला मिळाले. कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढल्याने होळीबरोबरच धुळवडीच्या रंगाचा बेरंग झाला. रविवारी जिल्ह्यात प्रत्येक गावच्या प्रथेप्रमाणे होळी साजरी करण्यात आली. यंदा कोरोनामुळे होळी साध्या पदधतीने साजरी करावी असे आवाहन करीत प्रशासनाने यावर काही निर्बंध घातले होते. सर्वच निर्बंध पाळले गेले नसले तरी होळीच्या सणावर कोरोनाचे सावट स्पष्टपणे दिसत होते. मध्यरात्री प्रज्वलीत होणार्‍या होळ्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारासच पेटवण्यात आल्या. ग्रामदेवतांच्या पालख्यादेखील गावोगावी दाखल झाल्या आहेत, मात्र दरवर्षी दिसणारी चाकरमान्यांची गर्दी गावात पहायला मिळाली नाही. या वेळी कोरोनाचे संकट दूरपार करे असे गारहाणे होलिकामातेला घालण्यात आले. धुळवडीचा सणदेखील साध्या पदधतीने साजरा झाला. ग्रामीण भागात लहान मुले आणि तरूण मंडळीने गल्लोगल्ली एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली. शहरी भागात मात्र सोसायट्यांपुरतीच धुळवड मर्यादीत राहिली. समुद्र किनारी होळी खेळण्यास मनाई असली तरी पर्यटकांनी समुद्रावर होळी खेळून समुद्रस्नानाचा आनंद घेतला. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या असूनही पर्यटकांची संख्यादेखील फारशी नव्हती.  स्थानिक तरूणाई मात्र यंदा समुद्राकडे फारशी फिरकली नाही. सोमवार तसा उपवासाचा दिवस असल्याने चिकन मटणाच्या दुकानावरदेखील गर्दी पहायला मिळाली नाही. रायगड जिल्हयात ठिकठिकाणच्या कोळीवाडयांमध्ये दरवर्षी पहायला मिळणारा उत्साह यंदा दिसला नाही. कोरोना आणि मासळीच्या दुष्काळामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत उत्साह खूपच कमी होता. या सणानिमित्त महिलांना होडीवर जाण्याचा मान मिळतो, मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्साह कमी असल्याचे दिसून आले. रात्री पारंपारीक पदधतीने होळीचे दहन करण्यात आले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply