Breaking News

राज्यात उन्हाच्या तीव्र झळा; तापमानात वाढ

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला होता. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाढलेले तापमान काही अंशी कमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातला पारा वाढला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. उन्हामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे. पारा वर गेल्याने नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे उष्णाघाताचा धोका टाळण्यासाठी दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात येत आहे. दरवर्षी कोकण पट्ट्यात नागरिकांना उन्हाचा फारसा त्रास जाणवत नाही, पण यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सुर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोकणातील नागरीकही हैराण झाले आहेत. पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहे. कारण 30 आणि 31 मार्च रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस तापमानाचा हा वाढता पारा कायम राहणार आहे. गरम आणि कोरड्या उत्तर पश्निमी वार्‍यांमुळे मुंबईतील तापमान वाढत आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहेे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज, उद्याही चटके

हवामान खात्याकडून मंगळवारी (दि. 30) आणि बुधवारी (दि. 31) पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. चेहरा झाकण्यासाठी रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, त्याचबरोबर दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply