

कर्जत : बातमीदार
तालुक्यातील आसल आणि माणगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नऊ आदिवासी वाड्यांना दरवर्षी मोठ्या पाणीटंचाईला सामोरे लागते. या आदिवासी वाडीमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही कालावधीसाठी सोडविण्यात यश येत असून, माणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सारंग कराळे यांच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली जात आहे. दरम्यान, कर्जतचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी या सर्व वाड्यांची पाहणी करून तेथील पाणीप्रश्न समजून घेतला.
आसल ग्रुपग्रामपंचायतीमधील आसलवाडी, भूतीवलीवाडी, धामणदांड, बोरीचीवाडी, धनगरवाडा, सागाचीवाडी या आदिवासी वाड्यांना उन्हाळ्यात नेहमीच पाणीटंचाईची झळ बसते. त्याबाबत वाडीमधील एका विद्यार्थिनीने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठवून पाणी टंचाईची दाहकता सर्वांसमोर आणली होती. जिल्हाधिकार्यांनी तात्काळ माथेरानला जाणार्या जलवाहिनेतून या वाडीला पाणी देण्याच्या सूचना नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिल्या होत्या. त्यानंतर आसल ग्रामपंचायतीमधील आदिवासी वाड्यांसाठी रबराची पाईप लाईन टाकून पाणी नेण्याचा निर्णय घेतला. त्याआधी ही पाईपलाईन माणगाव ग्रामपंचायतीमधील बेकरेवाडी येथून जात होती. माणगाव ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीमधील आदिवासी वाड्यांंना पाणी देण्याचा प्रयत्न करून, पुढे ते पाणी आसल ग्रामपंचायत हद्दीमध्ये पोहचविले. माणगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य सारंग कराळे यांनी आसल ग्रामपंचायतीमधील सर्व वाड्यांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जलवाहिनी फिरवून त्या सोबत सर्व वाड्यांत पाणी साठवण टाक्या उभ्या करून घेतल्या आणि त्यात पाणी सोडले. त्याचा चांगला परिणाम झाला असून, आसल ग्रामपंचायत हद्दीमध्ये यावर्षी पाणी टंचाईच्या झळा कमी बसत आहेत. आसल आणि माणगाव ग्रामपंचायत हद्दीमधील या सर्व आदिवासी वाड्यांना कर्जतचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी माणगावच्या सरपंच कल्याणी सारंग आणि आसलचे सरपंच रमेश लदगे यांनी गटविकास अधिकार्यांसोबत ग्रामपंचायतीमधील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी मोहन वरघडे, भगवान कोकरे, नारायण पिरकर यांच्यासह ग्रामस्थदेखील उपस्थित होते.