Breaking News

अलिबागच्या पांढर्‍या कांद्यावर राज्यातील पाच जिल्ह्यांत संशोधन

कर्जत : संतोष पेरणे                            

अलिबागचा पांढरा कांदा हा चिखट चव देणारा असतो आणि त्यामुळे या कांद्याला मोठी मागणी असते. त्याचे उत्पादन राज्यातील अनेक भागात घेता यावे, यासाठी पांढर्‍या कांद्याला मानांकन मिळविण्याकरिता राज्य कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने भाताचे वाण विकसित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत कृषी संशोधन केंद्रात यावर्षी पहिल्यांदाच पांढर्‍या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील तब्बल 285 हेक्टर जमिनीवर पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून अलिबागच्या पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला असलेली मागणी लक्षात घेता कृषी विभागाने राज्यातील वेगवेगळ्या भागात कांद्याचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार डिसेंबर 2020 मध्ये पालघर, जळगाव, धुळे आणि नागपूर जिल्ह्यात अलिबागच्या पांढर्‍या कांद्याची लागवड करण्यात आली. यातून कांदा उत्पादनाबरोबरच पांढर्‍या कांद्याचे बीज तयार करण्याचा प्रयत्न राज्य कृषी विभागाने केला आहे. बिजोत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरू केले आहेत, ते यशस्वी झाल्यास अलिबाग शिवाय अन्य भागात पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेता येईल व त्यातूनच अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळू शकेल. अलिबागसारखे वातावरण जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असून तेथे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे भात संशोधन केंद्र आहे. या कृषी संशोधन केंद्रात भाताचे वाण विकसित केले जाते, मात्र शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे या भात संशोधन केंद्राच्या नेमिनाथ अपार्टमेंटच्या समोरील शेतात पांढर्‍या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. सध्या हे पीक चांगले बहरले आहे. कर्जत कृषी संशोधन केंद्रात दरवर्षी भाताच्या वाणाचे संशोधन केले जाते तसेच सुमारे 15 प्रकारचा भाजीपाला पिकविला जातो. पण येथील अलिबागच्या पांढर्‍या कांद्याची शेती कर्जतकर सध्या कुतुहलाने पाहत आहेत.

पांढर्‍या कांद्याचे उत्पादन अधिक व्हावे यासाठी कृषी विभागाने ग्रेट मिशन अंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. या कांद्याचे बीजोत्पादन हाती येण्यास आणखी काही वर्षे लागतील, परंतु सर्वच ठिकाणी चांगले पीक दिसून येत आहे.

-पांडुरंग शेळके, कृषी अधीक्षक, कृषी विभाग, रायगड

कोकण कृषी विद्यापीठाचे कर्जत येथे भात संशोधन केंद्र आहे, मात्र तेथे वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला  शेतीदेखील करण्यात येते. कृषी विभागाने सूचीत  केल्याप्रमाणे यावर्षी अलिबागच्या पांढर्‍या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र एका वर्षात कोणतेही संशोधन होत नाही.

-डॉ. रवींद्र मर्दाने, सहाय्यक संशोधक, कृषी संशोधन केंद्र, कर्जत

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply