पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 अंतर्गत 30 व 31 मार्च रोजी अनुक्रमे जुना पनवेल कोळीवाडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन अशा दोन ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा 296 जणांनी लाभ घेतला. या वेळी लाभार्थ्यांना मोफत औषधोपचार तसेच आवश्यक रक्त चाचण्या मोफत करण्यात आल्या आहेत. शिबिरांचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, नगरसेवक डॉ. अनिल भगत, महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आंनद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर व आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 येथे 172 व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 येथे 124 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच नगरसेविका दर्शना भोईर यांच्यातर्फे उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले. या शिबिराकरीता पनवेल शहरातील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. ययाती गांधी, मधुमेह विकार तज्ज्ञ डॉ. समुद्रे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कुलकर्णी, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. म्हात्रे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुराडे आदींनी त्यांच्या प्रतिनिधींनी मोफत आरोग्य सेवा केली.